‘मशाल धगधगणार, मुंबई जिंकणार’, दसरा मेळाव्याच्या तोंडावर बॅनरबाजीला ऊत, वातावरण तापलं
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांच्या मेळाव्यांमुळे राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवाजी पार्क आणि आझाद मैदान या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे या दसऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बॅनरबाजीद्वारेही शक्तीप्रदर्शन सुरू आहे.

दसरा… हिंदू संस्कृतीतील प्रमुख सणांपैकी एक असलेला हा उत्सव अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला असून महाराष्ट्राच्या राजकारणातही या सणाचे विशेष महत्व असते. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने अनेक पक्ष आपापली भूमिका मांडत असतात, स्पष्ट करत असतात, पण मुंबईत दसऱ्याचे आकर्षण म्हणजे शिवसेनेचा मेळावा. एकनाथ शिंदे यांनी बंड करत फडणवीसांचा हात धरल्यापासून शिवसेनेचे दोन भाग झाले आणि उद्धव ठाकरे गट वि एकनाथ शिंदे गट, असे दोन गटही पडले. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून शिवसेना ठाकरे गट वि. शिवसेना शिंदे गट यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोप, कुरघोडीचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेला सातत्याने पहायला मिळत आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असते. पुढल्या गुरूवारी, अर्थात 2 ऑक्टोबरला यंदा दसरा असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे यंदाही 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. या दोन्ही मेळाव्यात काय भाषणे होतात, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे तर आझाद मैदानावर शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॅनरबाजीने वातावरण तापले
मात्र याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागलं आहे, कारण दसरा मेळाव्याच्या तोंडावर शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजीला सुरूवात झाली आहे. मुंबईतील दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली असून, शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजीने वातावरण तापलेलं दिसतंय. ’मशाल धगधगणार, मुंबई जिंकणार’ अशा आशयाचे बॅनर लावून ठाकरे गटाकडून शिवसैनिकांचे स्वागत करण्यात येत आहे. पुढील गुरूवारी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा, तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.
मात्र त्यापूर्वी बॅनरबाजीला ऊत आला असून बॅनरबाजीच्या माध्यमातून उद्धव गटाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा संदर्भ देत ‘मुंबई जिंकणार’चा नारा दिला आहे. लवकरच महापालिका निवडणुकांच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा तारखांची घोषणा होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर हा मेळावाही महत्वाचा ठरत आहे.

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरच्या पहिल्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व
बॅनरबाजीतून शक्तीप्रदर्शन सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे युवा सरचिटणीस जितू वीरा, साक्षात मात्रे आणि दूतेश राहते यांच्या पुढाकाराने बॅनरबाजी करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याला काही दिवस शिल्लक असताना दोन्ही गटांत स्पर्धात्मक वातावरण दिसत आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा असल्याने त्याला विशेष महत्त्व आलं आहे. या मेळाव्याला राज ठाकरे हजेरी लावतात का, भाषण करतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच उद्धव ठाकरे या मेळाव्यातून शिवसैनिकांना काय संबोधन करतात, काय संदेश देतात याचीही सर्वांना उत्सुकता आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाने बॅनरबाजी करताना थेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा संदर्भ देत ‘मुंबई जिंकणार’ असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे.मुंबईतल्या दसरा मेळाव्याला अवघ्या काही दिवस बाकी असताना दोन्ही शिवसेनेत स्पर्धात्मक वातावरण तापलं असून बॅनरबाजीमुळे राजकीय रंगत आणखी चढली आहे.
