शरद पवार आणि आशा भोसलेंनाही गद्दार म्हणणार का? संजय शिरसाट यांचा संजय राऊत यांना खडा सवाल
कधी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा लढलीय का. त्यांना काय माहीत आहे. भाषण करणं वेगळं आणि तळागाळात जाऊन काम करणं वेगळं. ते फक्त पोपटपंची करतात, असे संजय शिरसाट म्हणाले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार नाही तर त्यांनी जणू अमित शाह यांचा सत्कार केला आहे, असे आम्ही मानतो. हा महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार आहे, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली. आता यावरुन शिंदे गटाचे आमदार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सवाल उपस्थित केला आहे.
संजय शिरसाट यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरुन संजय राऊतांनी टीका केली आहे. त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी भाष्य केले. संजय राऊत शकुनी आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही फुटण्यास ते कारणीभूत झाले, असे संजय शिरसाट म्हणाले.
“संजय राऊत शकुनी, तेच सर्व गोष्टीला कारणीभूत”
“अनेक मुख्यमंत्र्यांच्या भेटी शरद पवार यांनी घेतल्या. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा त्यांनी केली. संजय राऊत यांना चर्चा नको. यांना फक्त राजकारण पाहिजे. गेल्या अडीच वर्षात यांनी काहीच केलं नाही. अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांना डांबून ठेवण्याचं काम केलं. राऊत हे राजकारणातील खलनायक आहेत. शकुनी आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही फुटण्यास ते कारणीभूत झाले. संजय राऊत यांनी ज्या भाषेने साहित्य संमेलनाला बोलले ते चुकीचं आहे. दलाल आहेत म्हणता. राऊतला साहित्य संमेलन कळलं का. सामनात येण्यापूर्वी नागडे उघडे फोटो छापणारा हा पत्रकार आहे. त्यांचा निषेध केला पाहिजे. त्यांना जोडे मारले पाहिजे. संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय हाच त्यावर उपाय आहे”, असे संजय शिरसाट म्हणाले.
“शिवसेनाप्रमुखांचे विचार पेलणारा नेता”
“एकनाथ शिंदे हे खान्दानी आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पेलणारा नेता. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांचा गौरव केला. हा शिंदेंचा बहुमान आहे. तुम्ही फक्त दलाली करत आहात. टीका करून दिवसाची सुरुवात कशी करायची, इतरांना कसं वाईट बोलायचं हाच त्यांचा धंदा आहे. महाविकास आघाडी राहिली कुठे. यांना काँग्रेस विचारते कुठे, राष्ट्रवादी यांना विचारते कुठे. तीन महिन्यात मातोश्रीला कोणी गेलंय का. हेच सिल्व्हर ओकवर जातात. हे आता एकटेच पडणार आहेत. यांचा अंत ठरला आहे”, असेही संजय शिरसाटांनी म्हटले.
“राऊतांवर उद्धव ठाकरे नाराज”
“पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला. तो महाराष्ट्राच्या प्रतिनिधीचा सत्कार आहे. त्याचा बहुमान एकनाथ शिंदेंना मिळाला याचा अभिमान आहे. शिवसेना प्रमुख स्मारक ट्रस्टचं अध्यक्षपद काढू नका हे सांगण्यासाठी हे लोक मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. विनवण्या करण्यासाठी फिरत असतात”,असेही संजय शिरसाट म्हणाले.
“राऊतांवर उद्धव ठाकरे नाराज आहेत. तर बोललं पाहिजे. उद्धव ठाकरे का बोलत नाहीत हे आश्चर्य आहे. यांचं काही तरी गुपित राऊतांकडे आहे. अशी मला शंका असते. नाही तर राऊतांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं नसतं. शिवसेना प्रमुख हयात असताना ही विधाने केली असती तर आतापर्यंत कुठे लाथ मारली असती आणि कुठे फेकलं असतं हे कळलं नसतं. मराठी महिला म्हणून प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. यांना हे कळत नाही”, असे संजय शिरसाट म्हणाले.
“शरद पवार आणि आशा भोसले यांना गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत”
“मराठी महिला म्हणून प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. यांना हे कळत नाही. उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांना गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. यांच्या विरहित कार्यक्रम केला तर गद्दार. गद्दार शब्द चिटकवण्याची त्यांच्याकडे स्पर्धा लागली आहे. चांगल्या माणसाने चांगलं काम केलेलं त्यांना आवडत नाही. आशा भोसले जेव्हा शिंदेंचं कौतुक करतात तेव्हा आपला शिवसैनिक कोणत्या स्तरावर गेला याचं त्यांना कौतुक नाही. जे त्यांना सोडून जातील ते सर्व यांच्या नजरेत गद्दार आहेत. मग शरद पवारांवरही गद्दारीचा शिक्का लागला की काय असा प्रश्न पडतोय. कोण आहे संजय राऊत. काय अस्तित्व आहे. कधी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा लढलीय का. त्यांना काय माहीत आहे. भाषण करणं वेगळं आणि तळागाळात जाऊन काम करणं वेगळं. ते फक्त पोपटपंची करतात”, असे संजय शिरसाट म्हणाले.