धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार की नाही…; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, थेट अमित शाहांचे नाव घेत म्हणाले…
धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता असताना, त्यांनी सुनील तटकरेंकडे भावनिक आवाहन केले. संजय राऊत यांनी यावरून खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरुन सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच आता धनंजय मुंडे यांनी खासदार सुनील तटकरेंकडे एक भावनिक आवाहन केले होते. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या, असे धनंजय मुंडे म्हणाले होते. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर भाष्य केले. अमित शाहांच्या आदेशामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर केलं आहे. त्यात अजित पवारांची फार काही भूमिका असं मला वाटत नाही. हे सर्व अमित शाह ठरवतात, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांच्यावरील आक्षेप विशिष्ट प्रकरणात आहे. पण तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे की पक्षाने त्यांना काय काम दिलं पाहिजे. हा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे. कोणताही राजकीय कार्यकर्ता कधीच रिकामी राहत नाही. तो स्वत:च काम काढतच असतो. अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मूळ मालक दिल्लीत बसले आहेत. दिल्लीच्या मालकांच्या आदेशामुळे म्हणजेच अमित शाहांच्या आदेशामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर केलं आहे. त्यात अजित पवारांची फार काही भूमिका असं मला वाटत नाही. हे सर्व अमित शाह ठरवतात. कारण त्यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीत अमित शाह आहेत. त्यामुळे मुंडे यांचं काय करायचे हे दिल्लीतून ठरेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
धनंजय मुंडे काय म्हणालेले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांचा रायगडमध्ये जाहीर सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सुनील तटकरे यांच्याकडे एक भावनिक विनंती केली. मी आज जे काही आहे, ते सुनील तटकरे यांच्यामुळेच आहे. माझ्या राजकीय प्रवासात वडील नसताना त्यांनी मला मोठा आधार दिला. राजकारणात माझे वडील नाहीत, पण त्यांच्या जागेवर मला सुनील तटकरे यांचा आधार मिळाला. त्यांनी अनेक वर्षांपासून देशातील आणि राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध जपले आहेत. महाराष्ट्राच्या मातीत नेमकं काय चाललं आहे, याची त्यांना अचूक जाण आहे. त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.” असे धनंजय मुंडे म्हणाले होते.
आपल्या भाषणाच्या अखेरीस त्यांनी तटकरे यांच्याकडे “माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या.” अशी मागणी केली होती.
