Shivsena Court Hearing : शिंदेंना एक मिनीट उशिराने मेसेज, 12.31 ची वेळ सगळा गेम फिरवणार? सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या वकिलाचा सर्वात मोठा युक्तिवाद!
21 जूनच्या बैठकीसाठी सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीने शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांना उपस्थित राहण्याचे पत्र पाठवण्यात आले होते. मात्र बैठकीचा कोणताही विशिष्ट अजेंडा नमूद नव्हता. फक्त उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते, असा युक्तीवाद शिंदे यांच्या वकिलाने केला.

Shivsena Party Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत आज (17 नोव्हेंबर) एकनाथ शिंदे यांचे वकील धृव मेहता यांनी युक्तिवाद केला. आपल्या या युक्तिवादात त्यांनी शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाने बोलावलेल्या बैठकीबाबत सविस्तर माहिती दिली. बोलावण्यात आलेली संबंधित बैठक ही शिवसेना विधिमंडळ पक्षाची होती, ती शिवसेना पक्षाची बैठक नव्हती, असं मेहता आपल्या युक्तिवादादरम्यान म्हणाले.
ती बैठक राजकीय पक्षाची नव्हती
तसेच, मेहता यांनी बोलावलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीविषयीही सांगितले. एकनाथ शिंदे यांना या बैठकीचा मेसेज एक मिनीट उशिराने पाठवण्यात आला, असं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सुनील प्रभू यांनी जो व्हीप काढला होता त्यातून हे स्पष्ट दिसून येत आहे की बोलावण्यात आलेली बैठक ही राजकीय पक्षाची नव्हती. ती बैठक ही विधीमंडळ पक्षाची होती. 21 जून रोजी बोलावलेली ही बैठक दुपारी 12.30 वाजता होती. परंतु एकनाथ शिंदे यांना तो मेसेज 12.31 वाजता व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आला, असं मेहता यांनी न्यायालयाला यावेळी सांगितले.
बैठकीचा कोणताही विशिष्ट अजेंडा नमूद नव्हता
21 जूनच्या बैठकीसाठी सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीने शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांना उपस्थित राहण्याचे पत्र पाठवण्यात आले होते. मात्र बैठकीचा कोणताही विशिष्ट अजेंडा नमूद नव्हता. फक्त उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांना मिटिंगच्या दिवशी 12.31 वाजता मेसेज पाठवला गेला. यातून काहीही सिद्ध होत नाही, असा मोठा दावा मेहता यांनी आपल्या युक्तिवादात केला.
त्या सह्या तपासल्या नाहीत
वर्षा बंगल्यावर जी बैठक झाली त्यावेळी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरून हटवलं. शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली. त्यावर अनेकांच्या सह्या आहेत असं सांगितलं. ज्यांनी सह्या केल्या त्या तपासल्या नाहीत, असेही यावेळी मेहता म्हणाले. दरम्यान, आता या सुनावणीत पुढे काय काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
