ठाकरे आणि मनसे युतीच्या हालचालींना वेग, दोन बड्या नेत्यांमध्ये गुप्त भेट; महिनाभरात काय घडलं?
ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांनी जोर पकडला आहे. वरुण सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्यात गुप्त भेटी झाल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमुळे ही युती महत्त्वाची आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांनी जोर पकडला आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबद्दल राजकीय वर्तुळात याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता या हालचालींना अधिकच वेग आल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरापासून मनसे आणि ठाकरे गटामध्ये युतीसाठी पडद्यामागे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
संभाव्य रणनीतीवर चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई आणि मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्यात गेल्या काही काळात २ ते ३ गुप्त भेटी झाल्याची चर्चा रंगली आहे. या भेटींमध्ये युतीच्या शक्यतांवर आणि तसेच संभाव्य रणनीतीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, मनसेचे आणखी एक महत्त्वाचे नेते संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यातही तब्बल ४ वेळा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीगाठींमुळे दोन्ही पक्षांतील नेतृत्वामध्ये संपर्क सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गुप्त भेटींचे आगामी महापालिका निवडणुका हे मुख्य कारण असल्याचे बोललं जात आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता दोन्ही पक्ष लवकरच एकत्र येणार असल्याचे बोललं जात आहे. या युतीचे संभाव्य परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसू शकतात, अशी शकतात. भाजप आणि शिंदे गट यांच्या विरोधात एक मजबूत पर्याय उभा करण्यासाठी ही युती महत्त्वपूर्ण ठरू शकते. अर्थात, अद्याप दोन्ही पक्षांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, पडद्यामागील या हालचाली पाहता, येत्या काळात या युतीबाबत अधिकृतपणे घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यातच आता राज्य सरकारच्या हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत ५ जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या घोषणेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर करत हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. यावरुन मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे एक पाऊल युतीच्या दिशेने पुढे आल्याचे बोललं जात आहे.
