
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली. याबाबत खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता यंदाही 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर राज्यभरातून शिवसैनिक येणार आहे. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय डरकाळी फोडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरवर्षी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. यंदाही शिवाजी पार्कवर हा मेळावा पार पडणार आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाने महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता महापालिकेने हा अर्ज स्वीकारून मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. यंदाच्या मेळावा हा खास असणार आहे, कारण मेळाव्यानंतर लगेच महापालिका निवडणूकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मेळाव्यातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘शिवतीर्थ’वर जाऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी महापालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल सव्वादोन तास बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत आणि अनिल परब हे नेतेही उपस्थित होते.
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी ‘शिवतीर्थ’वर गेल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित रागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच काही राजकीय विश्लेशकांनी दसरा मेळाव्यात या दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता दोन तारखेला शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्याकडे शिवसैनिकांसह मनसैनिक आणि राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.