आधी 800 रुपयांवरून भांडण, मग दगडाने हत्या; मृताचे दात बॅगेत घेऊन फिरत होता आरोपी; जळगाव हादरलं !
जळगावमध्ये ८०० रुपयांच्या किरकोळ वादातून एका इसमाने आपल्याच मामेभावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने क्रूरपणे मृतदेहाचे दात उपटून बॅगेत ठेवले. पोलिसांनी तत्परतेने तपास करत आरोपी जुगा पवार याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

राज्यभरात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून छोट्याछोट्या कारणांवरूनही लोकं एकमेकांच्या जीवावर उठत असल्याची तर कधी मारहाण करत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. असाच एक भयानक प्रकार जळगावमध्ये घडला आहे. तिथे एका इसमाने शुल्लक कारणावरून त्याच्याच मामेभावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या 800 रुपयांच्या वादातून आत्तेभावाने त्याच्या मामेभावाला संपवलं. एवढंच नव्हे तर मारेकऱ्याने मृत इसाचे सर्व दात तोडून त्याच्या बॅगेत ठेवल्याचंही उघड झालाय. या हत्याकांडामुळे मोठी खळबळ माजली असून नागरिक दहशतीखाली जगत आहेत. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी कसून तपास करत आरोपी जुगा पवार याला शोधून बेड्या ठोकत अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या जळगावच्या भडगाव परिसरात हे हत्याकांड घडलंय. 800 रुपयांच्या वादातून आत्ते भावानेच मामे भावाचा खून केला. धर्मा जुगा पवार असे मृताचे नाव असून जुगा कांतिलाल पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे. ते दोघे भाऊ होते.
पोलसांच्या सांगण्यानुसार, धर्मा पवार आणि जुगा पवार हे दोघेही गावोगावी जाऊन बनावट रुद्राक्ष विकण्याचे काम करत होते. काल धर्मा पवार याने 800 रुपयांची रुद्राक्ष विकली होती. त्यानंतर संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास ते दोघे स्टेशनजवळ दारू प्यायला बसले. मात्र दारू पिता पिताच दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. पाहता पाहता भांडण वाढलं आणि रागाच्या भरातच आरोपी जुगा याने धर्मा पवार याला दगडाने मारहाण करत त्याचा खून केला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या हत्याकांडामुळे गावात मोठी खळबळ माजली. खुनाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. शेताजवळ कुत्रे भुंकत असल्याचा आवाज आल्याने पोलिसांनी त्या दिशेने शोध घेतला. त्यावेळी आरोपी दारूच्या नशेत शेतात बसलेला पोलिसांना आढळून आला. त्याच्या बॅगेत मृताचे दात तसेच दोन जिवंत कबुतरं आढळली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी जुगा याला ताब्यात घेत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
