भारत स्वत:हून छेड काढणार नाही, दुसऱ्याने काढली तर..; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे. भारत स्वत:हून कोणाचीही छेड काढणार नाही आणि कोणी काढलीच तर सोडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या एअर-स्ट्राइकचं देशभरातून कौतुक केलं जात आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया दिली आहे. “भारत स्वतःहून कोणाची छेड काढत नाही, मात्र कोणी केलं तर सोडायचं नाही. ही कारवाई योग्य आहे,” असं अण्णांनी म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्याच्या 14 दिवसांनंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. मध्यरात्री 1.05 ते 1.30 वाजताच्या दरम्यान झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मुहम्मदच्या मुख्यालयांना लक्ष्य करण्यात आलं.
काय म्हणाले अण्णा हजारे?
“भारतीय लष्कराने केलेल्या कामाचं कौतुक शब्दांत करता येणार नाही. इतकं सुंदर काम लष्कराने केलंय. भारत स्वतःहून कोणाची छेड काढणार नाही. मात्र दुसऱ्याने छेड काढली तर सोडायचं नाही. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरची ही कारवाई योग्यच आहे. काही कारण नसताना आपले 26 लोक मारले गेले. त्याचाच सूड भारताने घेतला आहे. त्यामुळे कोणी काही बोलू शकत नाही. अशा प्रकारे कारवाई केल्याने आता कुणाचीही हिंमत होणार नाही,” अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. या ऑपरेशनवर देशभरातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या कोणकोणत्या ठिकाणांवरील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले..
- बहावलपूरमधील दोन ठिकाणं
- मुरीदके
- मुझफ्फराबाद
- कोटली
- गुलपूर
- भिंबर
- चक अमरू
- सियालकोट
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांना ‘युद्धाची कृती’ असं म्हटलंय. त्याचप्रमाणे त्यांच्या देशाला योग्य प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं ते म्हणाले. भारताने असंही स्पष्ट केलंय की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनेला लक्ष्य केलेलं नाही. भारताने लक्ष्यांची निवड आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमध्ये खूप संयम दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं बारकाईने निरीक्षण केलं.
