होय, अमित शाहांनी जिथून टीका केली, ते मैदान पवारांनीच बांधलंय

पवारांनी काय केलं ते भाजप विचारत आहे, पण भाजपने सभा घेतलेलं मैदानाच पवारांनी बांधलंय, असा दावा पवार समर्थकांकडून केला जातोय. खरंच हे मैदान (Solapur Indira Gandhi Stadium) पवारांनी बांधलंय का याची माहिती टीव्ही 9 मराठीने जाणकारांकडून घेतली.

होय, अमित शाहांनी जिथून टीका केली, ते मैदान पवारांनीच बांधलंय

सोलापूर : भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप सोलापूरमध्ये पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अमित शाहांनी टीका केली. त्यामुळे भाजपने सभा घेतलेलं इंदिरा गांधी मैदानच (Solapur Indira Gandhi Stadium) सभेपेक्षा जास्त चर्चेत राहिलं. पवारांनी काय केलं ते भाजप विचारत आहे, पण भाजपने सभा घेतलेलं मैदानाच पवारांनी बांधलंय, असा दावा पवार समर्थकांकडून केला जातोय. खरंच हे मैदान (Solapur Indira Gandhi Stadium) पवारांनी बांधलंय का याची माहिती टीव्ही 9 मराठीने जाणकारांकडून घेतली.

सोलापूरचं इंदिरा गांधी स्टेडिअम, अर्थात पार्क स्टेडिअम.. या स्टेडिअमवर खेळल्या जाणाऱ्या खेळापेक्षा इथे झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या खेळीमुळेच हे मैदान आता चर्चेचं केंद्रस्थान बनलंय. शरद पवारांनी सत्तेत असताना कोणता विकास केला, असा सवाल अमित शाहांनी उपस्थित केला होता. पण ज्या व्यासपीठावरून अमित शाह बोलत होते, ते इंदिरा गांधी स्टेडिअमच पवारांमुळे झालं असल्याचं सांगण्यात येतंय. तर पवार समर्थक विनाकारण पवारांना श्रेय देत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

माजी महापौर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते पुरणचंद पुंजाळ यांच्या मते, 1972 मध्ये शरद पवार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे क्रीडा राज्यमंत्री होते. सोलापूरला एथलेटिक्सच्या बैठकीला आल्यानंतर पवारांनीच सोलापूर महापालिकेला स्टेडिअम उभारण्याची संकल्पना दिली. त्यासाठी तत्कालीन क्रीडामंत्री बॅ. शेषराव वानखेडे यांच्याकडून दोन लाख रुपयांची तरतूद करायला लावली. चार टप्प्यात बांधकाम करण्याचं ठरवलं. त्यामुळे इंदिरा गांधी स्टेडिअमच्या संकल्पनेचं श्रेय पवारांनाच जातं, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

भाजपचे नेतेही सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडिअमची संकल्पना आणि निर्मितीमध्ये पवारांचा वाटा असल्याचं जाहीरपणे मान्य करत नाहीत. पण यात अप्रत्यक्षपणे पवारांचीच मदत झाल्याचं भाजपचेही नेते म्हणतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *