विधानसभेसाठी राज ठाकरे मैदानात, मराठवाडा दौऱ्याआधी महत्वाची बैठक; ‘भावी मुख्यमंत्री’ कोण म्हणालं?
Raj Thackeray in Solapur : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोलापुरात आहेत. विधानसभा निवडणुकीआधी राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मराठावाडा दौऱ्याआधी राज ठाकरे आज सोलापुरात असणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना भेटण्यासाठी गर्दी केली होती. वाचा...

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मनसेने देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांपासून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत सगळ्यांनीच तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत. याआधी राज ठाकरे आज सोलापुरात आहेत. सोलापुरात ते मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सोलापुरात राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणत कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं.
राज ठाकरे सोलापुरात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूरमध्ये दाखल झालेत. सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणत कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे दाखल होताच जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. राज ठाकरे आजपासून 13 ऑगस्ट पर्यंत मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत. आज ते सोलापुरात मुक्कामी आहेत. उद्या इच्छुक उमेदवार तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती आहे. शासकीय विश्रामगृहाबाहेर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते जमलेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याचं बोललं जात होतं. उद्या सकाळी 9 वा भेटायला या, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
मनसेच्या भूमिकेकडे लक्ष
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची असणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आता नुकत्याच झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मात्र राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे ‘एकला चलो रे’ चा नारा दिला. कारण 225- 250 जागा मनसे लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या दौरा करत आहेत. 13 ऑगस्टपर्यंत ते मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत.
