तुमच्या सासू आणि बहिणीला नाही पाडलं तर नाव…भाजप आमदाराला शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं चॅलेंज

"तो एक वर्षाचा आमदार आहे, बॅलेट पेपरवर मतदान झाले तर भाजप, MIM आणि शिवसेना विरोधात लढली तर शिवसेना निवडून येईल.आमदार देवेंद्र कोठे यांना घरात, हॉटेल आणि ऑफिसमध्ये बसून महापालिका चालवायची आहे" असे आरोप अमोल शिंदे यांनी केले.

तुमच्या सासू आणि बहिणीला नाही पाडलं तर नाव...भाजप आमदाराला शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं चॅलेंज
Devendra Kothe
Dinananth Parab | Updated on: Jan 14, 2026 | 3:52 PM

सोलापुरात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजप आमदार देवेंद्र कोठे यांना आव्हान दिलं आहे. भाजपकडून पैसे वाटप करुन दबावाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप अमोल शिंदे यांनी केला आहे. “मला जेलमध्ये टाकण्याचा भाजपाचा डाव असून मी जेलमध्ये गेल्यास कर्तकर्ते निवडणूक लढवतील. आमदार देवेंद्र कोठे तुमच्या सासू आणि बहिणीला निवडणुकीत पाडल्याशिवाय अमोल शिंदे नाव सांगणार नाही” असं अमोल शिंदे म्हणाले. “भाजपने सुरवातीला 75 पारचा नारा दिला मात्र 50 टक्के उमेदवारी बाहेरचे दिले. भाजपने निष्ठावंताना बाहेर ठेवले आणि 50 टक्के उमेदवार देवेंद्र कोठेनी बाहेरचे दिले. मुळात mim मधून मागीलवेळी लढलेल्या व्यक्तीला यावेळी भाजपने उमेदवारी दिली. भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्यांना आमदार देवेंद्र कोठे यांनी उमेदवारी दिल्या” असे आरोप अमोल शिंदे यांनी केले.

अमोल शिंदे, संतोष पवार, चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे या विविध समाजातील नेत्यांना संपवण्याचा डाव देवेंद्र कोठे यांनी केलाय. 2017 साली नाना काळे यांना देवेंद्र कोठे यांनी पाडले आणि आता त्यांना भाजपतून तिकीट दिले. मराठा समाजाचा एवढा उमाळा का आला?. आमदार देवेंद्र कोठे यांनी बाराबंदी घालून भाजपचा प्रचार केला. उत्तरचे लिंगायत नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न रात्ररात्र जागून करताय आणि बाराबंदी घालून प्रचार करताय” असा आरोप अमोल शिंदे यांनी केला. देवेंद्र कोठे यांना पुढील विधानसभेला शहर उत्तर मधून विधानसभा लढवायची आहे, असं ते म्हणाले,

कदाचित मला जेलमध्ये टाकतील, पण…

“पालकमंत्री रात्री 10 नंतर शहरातील विविध भागात फिरत आहेत. पैसे वाटप करत आहेत. पालकमंत्री रात्री 10 नंतर विविध भागात फिरत आहेत, त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवतो. पालकमंत्री हे देवेंद्र कोठेच्या नादाला लागून पान टपरीवर येऊन बसले आहेत. उद्या मला अटक झाली तर माझ्या कुटुंबाला घेऊन मतदान करून घ्या. सांगोल्यात शहाजी बापू पाटलांना त्रास दिला तसेच सोलापुरात अमोल बापूला त्रास दिला जात आहे. कदाचित मला जेलमध्ये टाकतील पण आपण निवडणूक लढायची आहे” असं अमोल शिंदे म्हणाले.

….तर नाव अमोल शिंदे सांगणार नाही

“आमदार देवेंद्र कोठे यांना चॅलेंज आहे, तुमच्या सासू आणि बहिणीला नाही पाडले तर नाव अमोल शिंदे सांगणार नाही. आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या शहर मध्य मतदार संघामध्ये लक्ष द्यावे. आमदार देवेंद्र कोठे हा MIM विरुद्ध निवडणूक लढून जिंकून आला आहे” असा दावा अमोल शिंदे यांनी केला.