Eknath Shinde vs Uddhav Thackeray : दोन्ही शिवसेना आमने-सामने, शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आपसात भिडले VIDEO
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : महापालिका निवडणुकीच्या मतदानाला आता काही तास उरलेले असताना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे सैनिक आपसात भिडले आहेत. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस उरला आहे. अधिकृत प्रचार थांबला असला, तरी राजकीय नेत्यांची परस्परांवर टिकाटिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. निवडणूक आयोगाने उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा दिली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका सुरु केली आहे. “एकदा प्रचार संपला की तो प्रचार संपतो ही आधीची पंरपरा होती. अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा अशी भूमिका त्यांनी काल घेतली. प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करु शकतात. सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशाचं वाटप सुरु आहे. पैशाची पाकिटं साडीतून, वृत्तपत्रातून पैशाचं वाटप सुरु आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. याच ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते EVM मशीनचा डेमो घेऊन घरोघरी प्रचार करत असल्याचा आरोप आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. यावेळी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, एकमेकांना धक्काबुक्की केली.
पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण
ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार पुजा आवारे यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेच्या सरिता ठाकूर निवडणूक रिंगणात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सरिता ठाकूर यांचे पती माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी धक्काबुक्की केली, असा ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. ठाणे महापालिका निवडणूक अधिकारी आणि पोलिसांकडून घडलेल्या प्रकारची शहानिशा सुरु आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण आहे.