
सोलापुरात 289 धार्मिक स्थळावरील भोंगे स्वतःहून उतरवण्यात आले आहेत. सोलापूर पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरुंच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने 192 मशिदी आणि दर्गे, 79 मंदिरे, 10 चर्च आणि 8 बौद्ध विहार असे एकूण 289 धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरवण्यात आले. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शिष्टाईला यश प्राप्त झाले. मागील महिन्यात किरीट सोमय्या यांनी मोर्चाचं आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली होती.
त्यानंतर पोलीस आयुक्तांनी सर्व धर्मगुरुंशी चर्चा करत भोंगे उतरवण्याचे तसेच आवाज मर्यादा पाळण्याचं आवाहन केलं होतं. धार्मिक स्थळांवरील भोंगे काढावे यासाठी आज शांतता कमिटीची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र बैठकीला येण्यापूर्वीच सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे संबंधित धर्मगुरूंनी स्वतःहून उतरवून बैठकीला उपस्थित राहिले. त्यामुळे आजची बैठक ही अभिनंदनाची बैठक झाल्याची भावना पोलीस आयुक्तांनी बोलून दाखवली.
सर्वच धर्माच्या धर्मगुरूंचे आभार मानतो
पोलीस आयुक्तांच्या आवाहनानुसार आम्ही आमच्या 99 टक्के धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले आहेत. मात्र आगामी काळात याची अंमलबजावणी सामाजिक सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांमध्ये ही व्हावी ही पोलीस आयुक्तांकडून अपेक्षा आहे. तर 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिरावरील भोंगा देखील आम्ही खाली उतरवला आहे. आम्ही सर्वच धर्माच्या धर्मगुरूंचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो.
आवाजाची मर्यादा पाळून स्पीकर लावावे लागणार
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलाय, त्यामुळे कुठल्याही धार्मिक स्थळांवर भोंगा किंवा स्पीकर लावता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बाहेरील तसेच वरच्या बाजूस भोंगे लावता येणार नाहीत. धार्मिक स्थळांमध्ये भोंग्याऐवजी आता आवाजाची मर्यादा पाळून स्पीकर लावावे लागणार आहेत. सोलापुरात आता धार्मिक स्थळांवरील भोंगे काढून एक चांगलं उदहारण समोर ठेवलं आहेत.
“सोलापुरचे कर्तव्यदक्ष आयुक्त यमराज कुमार यांनी या आयुक्तालयात सोलापुरातील सर्व मंदिर, मशिदी जी-जी धार्मिक स्थळ आहेत, त्यांची बैठक घेतली. धार्मिक स्थळांवरचा भोगा का काढायचा? त्याची माहिती दिली“ अशी माहिती मीटिंगला उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याने दिली.