प्रणिती शिंदे यांच्याविरोधात भाजपकडून ‘हा’ दिग्गज उमेदवार? भाजपची मोठी खेळी

| Updated on: Mar 19, 2024 | 8:44 PM

सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपने सोलापुर लोकसभेसाठी दिग्गज उमेदवार निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांच्या विरोधात भाजप पद्मश्री पुरस्काराने सन्मानित दिग्गज व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.

प्रणिती शिंदे यांच्याविरोधात भाजपकडून हा दिग्गज उमेदवार? भाजपची मोठी खेळी
Follow us on

सोलापूर | 19 मार्च 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. भाजपने महाराष्ट्रात 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण अजूनही 28 मतदारसंघांच्या उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही. पण तरीही भाजपने 20 उमेदवारांची नावे घोषित केली आहे. विशेष म्हणजे भाजप 30 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या दौऱ्यावेळी खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. पण यावरुन भाजपमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळाला. नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयात तर पदाधिकाऱ्यांनी थेट यावरुन ठिय्या आंदोलन केलं. या सर्व घडामोडींदरम्यान आता सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपने सोलापुर लोकसभेसाठी उमेदवार निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून पद्मश्री आणि उद्योजक मिलिंद कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे. मिलिंद कांबळे हे डिक्की अर्थात दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर 2013 साली त्यांना राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मिलिंद कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करत आहेत. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना टक्कर देण्यासाठी एक प्रतिष्ठित आणि उच्चशिक्षित चेहरा म्हणून भाजपकडून मिलिंद कांबळे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय?

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर गेल्या काही पंचवार्षिक निवडणुका पाहिल्या तर इथे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार आलटून पालटून निवडून आले आहेत. सोलापुरात सध्या भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. त्याआधी 2014 च्या निवडणुकीवेळीदेखील ही जागादेखील भाजपने जिंकली होती. त्याआधी 2009 च्या लोकसभा निवडणुकीवेळी सुशीलकुमार शिंदे हे विजयी झाले होते. सुशीलकुमार शिंदे या मतदारसंघात लोकसभेसाठी तीनवेळा जिंकून गेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.