Waghya Statue : वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवणार? वाद पेटलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

Waghya Statue Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून शा‍ब्दिक चकमकी वाढल्या आहेत. एक एक वाद समोर येत असतानाच आता या वादाची त्यात भर पडली आहे. आता हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात आल्यावर त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Waghya Statue : वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवणार? वाद पेटलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा
वाघ्याचा वाद, काय आहे तोडगा?
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 29, 2025 | 3:26 PM

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून वादाची नांदी उभी ठाकली आहे. राज्यात कबरी ते कामरा असा वादाच्या प्रवासाने आणखी एक गंभीर वळण घेतले आहे. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून वाद उभा ठाकला आहे. त्यावर संभाजीराजे छत्रपतींनी काही पुराव्यांचा दाखला देत वाघ्याचे स्मारक तिथं नव्हते असा दावा केला आहे. तर होळकरांच्या वंशजांनी त्यांची भूमिका मांडली आहे. या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांसी संवाद साधला. त्यावेळी वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयीचा वाद समोर आला. यासंदर्भात सर्वांशी चर्चा करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या स्मारकाकरीता होळकरांनी त्यावेळी पैसे दिले आहेत. त्यामुळे थेट पुतळा काढण्याबाबत समाजात रोष सुद्धा आहे. इतकी वर्षे झाली तो वाघ्याचा पुतळा तिथे आहे. त्यामुळे त्याविषयीचा निर्णय चर्चा करून घेण्यात येईल असे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले.

प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे का?

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावरून वाद करणार्‍यांचे कान टोचले. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असे आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला. या विषयावर वाद करू नये. सर्वांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकांविरोधात उभे झालेले दिसतात. एकीकडे धनगर समाज वेगळा, दुसरीकडे मराठा समाज वेगळा, हे दोन्ही समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद घालणं अयोग्य असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले. या प्रकरणात बसून मार्ग काढायला हवा असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

रायगडावरील वाघ्या कुत्र्‍याची समाधी हटवा अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतली होती. त्यांनी याविषयीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेड पण वादात उतरली आहे. वाघ्याची समाधी 1 मे पर्यंत हटवण्याचे अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडने दिले आहे. तर होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी सुद्धा या वादात उडी घेतली. या स्मारकाबाबत आमच्या समाजाच्या भावना आहेत. याविषयीचा निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजू ऐकून घेण्याचे मत त्यांनी मांडले. तर सध्या राज्यातील विविध वादावर सुद्धा तोंडसुख घेतले.