पुण्यात अजब प्रकार, हॉरर सिनेमाचा सस्पेंस पत्नीला मोठ्याने सांगत होता, जाब विचारल्याने मारहाण
पुणे थिएटरमध्ये हाणामारीचा प्रकार घडला आहे.या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरोधात तक्रार नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

चित्रपटाचा सस्पेन्स उघड केल्यानंतर अनेकांचा हिरमोड होत असतो. आणि त्यामुळे चित्रपट पाहाण्यातील खरी मजाच निघून जाते. अनेकदा समाजमाध्यमावरही समीक्षण लिहिण्याच्या नावाखाली चित्रपटाची कथा सांगितल्याने हा चित्रपट पहाण्यातील सस्पेन्स निघून जात असतो. त्यामुळे समीक्षण लिहिताना स्पॉयलर देऊ नये असा संकेत पाळला जात असतो.परंतू थिएटरमध्येही अनेक चित्रपटात पुढे काय होणार हे मोठ्याने सांगत असतात. त्यामुळे चित्रपट पाहायला आलेल्या इतरांना इंटरेस्ट संपूर्ण जात असतो.
आता पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागात एका सिनेमागृहात अशी एक अजब घटना घडली आहे. येथे सिनेमागृहात हॉरर चित्रपट सुरु असताना एका व्यक्ती त्याच्या पत्नीला सिनेमाची कथा मोठ्या आवाजात सांगत होता. त्यामुळे हा हॉरर सिनेमा उत्कटतेने पाहणाऱ्यांचा हिरमोड झाला. पुढे बसलेल्या व्यक्तीने त्याला हटकले, त्यामुळे चिडलेल्या व्यक्तीने हटकणाऱ्यालाच चोपल्याचा प्रकार घडला आहे.
ही घटना गेल्या आठवड्यात चिंचवड येथील एका मल्टीप्लेक्समध्ये घडली. तक्रारदार त्याच्या पत्नी सोबत इंग्रजी हॉरर चित्रपट ‘द कॉन्ज्यूरिंग-लास्ट राईट्स’ पाहायला गेला होता. चित्रपट सुरु असताना एक अन्य व्यक्ती त्याच्या पत्नीला चित्रपटाची कथा सांगत होतात.त्यामुळे इतर पाहणाऱ्यांचा चित्रपटाचा सस्पेन्स आधी कळत असल्याने हिरमोड होत होता.
जेव्हा तक्रारदारने त्या व्यक्तीला असे करुन नकोस शांतपणे चित्रपट पाहा असे सांगण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती भडकली. त्याने तक्रारदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा तक्रारदाराच्या पत्नीने अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या महिलेलाही या आरोपीने मारहाण केली. या प्रकरणात तक्रारदाराला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर चिंचवड पोलिसात तक्रार करण्यात आली.
पोलिसांनी तक्रार दाखल केली
पोलिसांनी तक्रारदाराचे म्हणणे ऐकून भारतीय न्याय संहितेचा 117, 115 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र अद्याप कोणाला अटक केलेली नाही.
