पटोलेंची अजितदादा, शिंदेंना ऑफर; मुनगंटीवारांनी एका वाक्यात विषय संपवला म्हणाले…

नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे.

पटोलेंची अजितदादा, शिंदेंना ऑफर; मुनगंटीवारांनी एका वाक्यात विषय संपवला म्हणाले...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2025 | 5:36 PM

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. मला वाटतं हा धुलिवंदनाचा जोक असावा, त्यांच्याकडे फक्त 46 आमदार आहेत, अतिशय चांगलं काम करणाऱ्या दोन उपमुख्यमंत्र्यांना संशयाच्या वातावरणात गुंतवायचं, जनता देखील काँग्रेसला सिरियसली घेत नाही तुम्ही देखील घेऊ नका, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली. या प्रकरणात निरीक्षण नोंदवताना न्यायालयानं असं म्हटलं की जर कोकाटे यांना शिक्षा झाली तर त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी लागले, आणि त्यावर जनतेचा पैसा खर्च होईल. यावर देखील सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने कुठल्या आधारावर निरीक्षण नोंदवलं माहीत नाही, पण निवडणुका घ्यायच्या, नाही घ्यायच्या, त्याबाबतचा खर्च हा निवडणूक आयोगाचा विषय आहे, उद्या कोर्ट पैसे वाचतील म्हणून पाच वर्षांऐवजी दहा वर्षांनी निवडणूक घ्या असं म्हणणार आहे का? त्यामुळे जी केस आहे त्याबाबतच कोर्टाचं निरीक्षण असावं, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षावर नाराज असून, ते भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला जे माहीत आहे त्याप्रमाणे जयंत पाटलांनी पक्ष बदलण्याचा कधीही विचार केलेला नाही, दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीबाबत अशा बातम्या वारंवार चालवून त्याला अडचणीत आणण्याचं काम होतं आहे, संयमित लोकशाही ही स्वैराचारी लोकशाहीकडे जात आहे आणि हे भविष्यासाठी धोकादायक आहे, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्यावर बोलताना  एका जरी शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी आम्ही सर्वांनी चिंतन केलं पाहिजे, विधानसभेत पूर्ण एक दिवस शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.