राष्ट्रवादीची बदनामी करणाऱ्यांना सुनेत्रा पवारांनी सुनावले खडे बोल, म्हणाल्या या 4 नेत्यांनी आता…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी आक्रमक भूमिका घेत ज्येष्ठ नेत्यांना कडक निर्देश दिले आहेत. पक्षात कोणतीही फूट नसून पक्ष एकसंध असल्याचा संदेश तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, तसेच भुजबळ आणि तटकरेंसह ४ बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

सध्या महाराष्ट्रात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अंतर्गत घडामोडींवर भाष्य करण्यात आले. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी आक्रमक भूमिका घेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट आणि कडक निर्देश दिले आहेत. “पक्षामध्ये कोणतीही फूट पडलेली नाही आणि पक्ष पूर्णपणे एकसंध आहे,” असा संदेश जनतेपर्यंत आणि तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, अशा सूचना यावेळी सुनेत्रा पवारांनी दिल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून आणि विविध माध्यमांतून राष्ट्रवादीच्या पक्षाच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावर सुनेत्रा पवार यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांना आता सडेतोड उत्तर द्या, अशा सूचना त्यांनी सूनेत्रा पवारांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्या. या बैठकीत बोलताना सुनेत्रा पवार यांनी पक्षाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. पक्षाची बदनामी थांबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील अंतर्गत वादांवर होत असलेल्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. पक्षात कोणतीही फूट पडणार नाही, पक्ष एक संध असल्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा, अशी सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या. तसेच पक्षात कोणत्याही ज्येष्ठ नेत्याचा अवमान होणार नाही, उलट सर्वांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही सुनेत्रा पवारांनी दिली. यामुळे पक्षातील अंतर्गत समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
चार प्रमुख नेत्यांवर मोठी जबाबदारी
तसेच प्रसारमाध्यमांमध्ये पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आणि विरोधकांचे आरोप खोडून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पक्षातील चार अत्यंत अनुभवी आणि विश्वासू नेत्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवल्याचे बोललं जात आहे. यामध्ये प्रामुख्याने सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रकाश सोळंके, अनिल पाटील या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता या नेत्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आणि मुख्य चेहरे म्हणून समोर राहून प्रत्येक वादग्रस्त मुद्द्यावर पक्षाची अधिकृत आणि स्पष्ट भूमिका मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या पदांच्या संभ्रमावर सारवासारव
गेल्या काही काळापासून पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पक्षातील नेमक्या पदांवरून आणि अधिकारांवरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. कार्यकर्त्यांमध्येही यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. या बैठकीत सुनेत्रा पवारांनी या मुद्द्यावर सारवासारव केली. नेत्यांमधील अंतर्गत संबंध आणि पक्षातील पदे यावरून कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या आक्रमक बैठकीतून आगामी काळातील राजकारणाचे संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर न राहता थेट फ्रंटफूटवर येऊन खेळण्याच्या तयारीत आहे. या बैठकीनंतर आता छगन भुजबळ, सुनील तटकरे यांसारखे दिग्गज नेते मैदानात उतरून विरोधकांना कसे प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.