दादांनंतर आम्ही पोरके झालो, पण तुम्ही पोरके होऊ नये म्हणून…; सुनेत्रा पवारांचं भावनिक वक्तव्य, राजकारणावरही व्यक्त केली खंत
Sunetra Pawar On Baramati Someshwar Sugar Factory: अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर बंडखोरीवरून संताप व्यक्त केला आहे.

बारामती तालुक्यात श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीत कार्यकर्त्यांच्या संवाद बैठका घेत आहेत. चोपडज येथील संवाद बैठकीत सुनेत्रा पवार अतिशय भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. चोपडज गावातील शेतकरी सभासद आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी स्व.अजितदादा पवार यांच्या कार्याचा आणि बारामतीच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, प्रचार करण्याशिवाय माझा प्रत्यक्ष राजकारणाशी दुरान्वये संबंध नव्हता. पण अपघाताने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने आपण सर्वच पोरके झालो. माझ्या घरावर तर आभाळच कोसळलं, जे होऊ नये ते घडलं. दादांनंतर आम्ही तर पोरके झालोच पण आपण सर्व पोरके होऊ नयेत म्हणून त्यांची जागा मी घेतली, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या बंडखोरीवरून ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, दादांना जाऊन केवळ आठ महिने झाले आहे. दादा गेल्यानंतर जे काय चाललं आहे ते आणि जे काय बघत आहे. काय माणसं विचार करत आहेत. यावरून माझ्या हे लक्षात येतंय की खरंच माणसं कशी विचार करतात आणि कसे आहेत? जी माणसं एकीकडे दादांचा ढोल ताशा लावून गजर करतात. तीच माणसं दादांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. पाठीमागं काय काय बोलत आहेत. जग आहे अनुभव येतात पण मी प्रत्यक्ष अनुभवत आहे, असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या जागेवर लोकांसाठी लोकांना आधार देण्यासाठी मी उभे राहिले. जन माणसांच्या अनेक अपेक्षा दादांकडून होत्या. दादांची देखील अनेक स्वप्ने होती. ती पूर्ण करण्यासाठी मी उभे राहिले. लोकांनी काय अर्थ घेतला काय नाही मला माहित नाही. मी जसं जमतंय जेवढं कळतंय तेवढं कळण्याचा प्रयत्न करत आहे. एक झालं की एक दुसरं सुरूच आहे, अशी खंतही सुनेत्रा पवार यांनी बोलून दाखवली आहे.
प्रत्येक गावात अनेक विकासकामे झाली आहेत. मात्र आज लोकांना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणारा, व्यक्तिगत लक्ष देणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. दादांनी आपल्या घराकडे कदाचित कमी लक्ष दिले. मात्र त्यांनी लोकांच्या प्रश्नांसाठी स्वतःला झोकून दिले. एवढे करूनही ‘दादांनी काही केले नाही’ असे बोलले जाते, याचे दुःख वाटते, असे त्या म्हणाल्या. विकासकामांबाबत टीका करणाऱ्यांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले, चार जणांनी रानात चार घरे बांधायची. तिथे लाईट आली नाही म्हणून दादांच्या नावाने बोंब मारायची, हे योग्य नाही. बारामतीत पाणी कोणामुळे आले, याचाही विचार झाला पाहिजे, असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं आहे.
मागे काय झाले, त्याची मला माहिती नाही. मात्र आता इथून पुढे काय करायचे, याची जबाबदारी माझी आहे. इथून पुढे जे काही लागेल, त्यासाठी मी तुमच्यासोबत उभी राहणार आहे. तुमच्यासाठी कायम उभी राहीन, अगदी दादांसारखी, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी चोपडज येथील ग्रामस्थांना दिला आहे. शेतकरी सभासद आणि ग्रामस्थांनी यावेळी विविध स्थानिक प्रश्न सुनेत्रा वहिनींसमोर मांडले. त्यांच्या प्रश्नांची माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.