
खासदार सुनेत्रा पवार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. ‘राष्ट्र सेविका समिती’ महिला शाखेचं आयोजन त्याठिकाणी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातील काही फोटो कंगना यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये संघाच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याविषयी सुनेत्रा यांनी स्पष्टीकरणसुद्धा दिलं. स्नेहमिलनासाठी बोलावलं होतं, म्हणूनच गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम होता, याची माहिती नव्हती, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.
याप्रकरणी अजित पवार यांनीही प्रतिक्रिया समोर आली आहे. “मला माहीत नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते, त्याची मिनिट-टू-मिनिट माहिती मला नसते. मी आता विचारतो, का गं कुठे गेली होतीस? काय, खरंच ना.. मला कधी कधी (हात जोडतात).. तो तुमचा अधिका आहे. परंतु आपण प्रश्न काय विचारावेत? अजित पवार वर्ध्यात आले आहेत, वर्ध्याच्या फायद्याचं काय विचारायचं, ते सोडून दिलं. कुठे ब्रेकिंग न्यूज काय देता येईल, यासाठीच प्रयत्न सुरू असतात”, असं ते म्हणाले. अजित पवार हे वर्धा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना सुनेत्रा पवार यांच्या RSS च्या कार्यक्रमातील उपस्थितीबद्दल प्रश्न विचारला होता.
आज मेरे आवास पर ‘राष्ट्र सेविका समिति’ महिला शाखा का आयोजन हुआ।हम सब मिलकर सनातन मूल्यों, हिन्दू संस्कृति और राष्ट्रीय चेतना को और प्रखर बनाएंगे।
हम सबका संकल्प है कि मानव सेवा, राष्ट्र निर्माण और सनातन संस्कृति के संरक्षण के लिए निरंतर कार्य करते रहेंगे।
महिलाओं की जागरूकता और… pic.twitter.com/Cu5PecbELP— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 20, 2025
दरम्यान कंगना यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत महिला शाखेच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. ‘आपण एकत्रितपणे सनातन मूल्ये, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीवेला अधिक प्रखर बनवुयात. मानवसेवा, राष्ट्र निर्माण आणि सनातन संस्कृतीच्या संरक्षणासाठी निरंतर कार्य करत राहण्याचा आम्हा सर्वांचा संकल्प आहे. महिलांची जागरुकता आणि त्यांचा सहभागच राष्ट्राला सशक्त बनवतो,’ असं त्यांनी लिहिलंय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना किंवा प्रतिनिधींना कधीही पाहिलं जात नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना संघाच्या कार्यक्रमात पाहिल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.