
सध्या महाराष्ट्रात अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची सातत्याने चर्चा आहे. अशोक खरातचे एकामागून एक काळे कृत्य समोर येत आहेत. तर दुसरीकडे अनेक मंत्री, राजकीय नेते अशोक खरातकडे जात असल्याचीही माहिती उघड होताना दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हाताला झालेल्या एका जुन्या जखमेचा संबंधही या प्रकरणाशी जोडण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. आता यावरुन सुनील तटकरे यांनी मौन सोडत सविस्तर भाष्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या बोटाला लागलेल्या जखमेच्या उलट-सुलट चर्चांवर सविस्तर सप्ष्टीकरण दिले. विरोधकांनी या जखमेचा संबंध नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुनील तटकरे यांनी स्वतः या प्रकरणाचा सविस्तर खुलासा केला आहे. माझ्या जखमेचा चुकीचा अर्थ काढला जात असेल तर ते दुर्दैव आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी अलिबाग येथे ही घटना घडली. आमचे माजी आमदार मधूशेठ ठाकूर यांची समाधी त्यांच्या गावात आहे. मी तिथे दर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळी जिल्ह्यातील नामांकित वकील ॲड. प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. आमचे कौटुंबिक नाते असल्याने ते सदिच्छा भेटीसाठी आले होते. दर्शन घेऊन मी गाडीत बसत असताना प्रवीण ठाकूर यांनी गाडीचा दरवाजा लावला आणि त्याचवेळी माझ्या अंगठ्याला मोठी जखम झाली. या घटनेनंतर तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार घेतले. त्यावेळी अंगठ्याला ५ स्टेप्लर टाके पडले, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.
त्यानंतर मी दिल्लीत आलो तेव्हाही माझ्या हाताला ती जखम होती. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असले तर दुर्देव आहे. यापेक्षा पुढे मग मी काय बोलू. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एआयटी स्थापन केली आहे. सातपुते या त्याच्या प्रमुख आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी याचा सखोल तपास करावा असं सांगितलं आहे. एक खासदार म्हणून माझीही हीच मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावे, असे सुनील तटकरे यांनी नमूद केले.
दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी सुनील तटकरे यांच्या जखमेचे फोटो शेअर केले होते. यावेळी त्यांनी “अशोक खरातच्या नादी लागून रक्ताचा अभिषेक केला होता का?” असा सवाल विचारला होता. यावर राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनीही प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता सुनील तटकरे यांनी आता स्वतःहून सर्व घडलेला प्रकार स्पष्ट केला आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.