2017 मध्ये भाजपसोबत जागा वाटपही झालं होतं… मीच वाटाघाटी करत होतो, सुनील तटकरे यांनी टाकला बॉम्ब
सुनील टकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी पक्ष एकत्रित असताना 2014 पासून भाजपसोबत युतीबाबत चार ते पाच वेळा चर्चा झाली होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

सध्या दोन्ही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोबतच दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येणार का? याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले तटकरे?
आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. राष्ट्रवादी पक्ष एकत्रित असताना 2014 पासून भाजपसोबत युतीबाबत चार ते पाच वेळा चर्चा झाली होती. 2014 ला आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा दिला, 2017 मध्ये आम्ही भारतीय जनता पक्षासोबत सरकारमध्ये सहभागी होणार होतो, लोकसभेचे जागा वाटप देखील झाले होते, कारण मी प्रदेशाध्यक्ष असल्याने त्या वाटाघाट्या मीच करत होतो. शिवसेनाबाहेर पडेल आणि आम्ही सरकारमध्ये जाऊ असे आम्हाला वाटले होते, मात्र शिवसेना सरकारमध्येच राहील असं भाजपने सांगितलं. 2019 ला देखील दोन्हीकडे चर्चा सुरू होती, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली, यावर देखील सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादांवर अशा पद्धतीने बोलणाऱ्या व्यक्तींबाबत मला बोलावसं वाटत नाही, त्यांना कोणीही गंभीर्याने घेत नाही. अजित दादांनी अर्थमंत्री या नात्याने ओबीसी घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने अजितदादांनी विविध घटकांना सोबत घेतले आहे, विविध समाज घटकांना मंत्रिपद देत न्याय दिला आहे. अजितदादा जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करणारे महत्वाचे नेते आहेत, त्याचा मला अभिमान आहे. अजितदादांवर टीका करणारे हे लोक दखलपात्र नाहीत, असा घणाघात यावेळी सुनील तटकरे यांनी केला आहे.
दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्यची चर्चा सुरू आहे. त्यातच आता पाच जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित राहणार आहेत. यावर देखील सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय ध्रुवीकरण सातत्याने घडत असतं, 2019 ते 2024 मध्ये जितके राजकीय धृवीकरण झाले तेवढे कधीच झाले नव्हते, आता याच्यापुढे काय काय होतं ते बघत राहावं, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून पाच जुलैच्या कार्यक्रमाचा टीजर जारी करण्यात आला आहे, यावर प्रतिक्रिया देताना तटकरे यांनी म्हटलं की, शिवसेनेच्या शाखा फलकावर आधीपासूनच वाघाचे चित्र असायचे, दोन भाऊ एकत्र येत आहेत, म्हणून टीजरमध्ये दोन वाघ दाखवले असतील, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
