सरकारी कर्मचाऱ्यांचा नियोजित मूक मोर्चा रद्द; संप मागे घेण्याच्या निर्णयाचे समर्थन

| Updated on: Mar 20, 2023 | 11:35 PM

गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मात्र हा निर्णय आम्हाला मान्य नसून हा संप मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे ठामपणे सांगण्यात आले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा नियोजित मूक मोर्चा रद्द; संप मागे घेण्याच्या निर्णयाचे   समर्थन
Follow us on

परभणी : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून जुनी पेन्शन योजना चालू करावी यासाठी बेमुदत संप पुकारला होता. त्यानंतर कर्मचारीच्या मध्यवर्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून हा संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. संघटनेच्या या निर्णयाचे कुठे समर्थन करण्यात आले तर कुठे त्याला विरोध करत हा संप तसाच चालू राहणार असल्याचे कळवण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने कर्मचाऱ्यांचा हा संप मागे घेत असल्याचे जाहीर करताच त्या निर्णयाचे संमिश्र पडसाद उमटले आहेत.

गोंदिया जिल्ह्यात संघटनेच्या विरोधात जाऊन हा संप तसाच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर परभणीतही उद्या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्य सरकारी कर्मचारी संघटने कडून संप मागे घेण्याच्या निर्णयाला परभणीत समर्थन मिळाले असून मूक मोर्चा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता संघटनेच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

संघटनेने जो निर्णय घेतला आहे त्याचे स्वागत परभणीत केले गेले आहे. त्यामुळे उद्यापासून शासकीय कार्यालये सुरळीत चालू राहणार असल्याचेही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संप मागे घेण्यात आला असला तरी यामध्ये फूट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेताच काही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या संपामध्ये आता दोन गट निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.

परभणीतही मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र आता समर्थन करत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मात्र हा निर्णय आम्हाला मान्य नसून हा संप मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे ठामपणे सांगण्यात आले आहे.