
मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी आता एकच आठवडा उरला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात मोठी धामधूम सुरू असून सर्वच पक्ष कंबर कसून तायरी करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सभांचा धडाक सुरू आहे. तर दुसरीकडे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आलेले ठाकरे बंधू, राज (Raj Thackrey) व उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांचीही तोफ धडाडत आहे. याच निमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेतली. त्यामध्ये ते मुंबईच्या दुरावस्थेवर बोलले, अदांनीचा डाव काय, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव ते मोदी-शहांच्या मनात काय आहे, अशा विविध विषयांवर ते सविस्तर बोलले.
याच मुलाखती दरम्यान संजय राऊत यांनीही दोघांना विविध प्रश्न विचारत बोलतं केलं. दोन्ही धुरंधर नेते एकत्र आले असून नवीन पर्व सुरू झालं आहे. तुम्ही मराठी माणसाला काय आवाहन कराल? असं संजय राऊत यांनी विचारल्यावर राज व उद्धव यांनी मनमोकळेपणाने उत्तर देत महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला.
देशभक्ती म्हणजे भाजप भक्ती नाही
मी महाराष्ट्राला एकच विनंती करेन की, आजपर्यंत आपण भाजपच्या नादी लागलो आणि त्यांनी आपलं आयुष्य बरबाद केलं. पण आता त्यांना महाराष्ट्राने दाखवून दिलं पाहिजे. शाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आता दिसला पाहिजे. आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी, पण त्याच्या अर्थ असा नाही की इतर भाषिकांवर अन्य्या करण्यासाठी आलोय. हिंदुत्वासाठी आलोय याचा अर्थ मुस्लिम किंवा ख्रिश्चनांवर अन्याय करू असं नाही. मुंबई महापालिका 25 वर्षे आमच्या ताब्यात दिली त्या मुंबईकरांमध्ये मराठी तर आहेतच, पण मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, काही प्रमाणात गुजरातीही आहेत, उत्तर भारतीयही आहेत आणि या सगळ्यांना आम्ही समान सुविधा दिल्या आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यांचं हिंदुत्व आणि यांचं देशप्रेम, खरं ते खरं आणि खोटं ते खोटं… एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे, देशभक्ती आणि भाजप भक्ती या दोन्ही गोष्टी 1 नाहीत. मी देशभक्त आहे याचा अर्थ मी भाजप भक्त नाही, किंवा जो भाजप अथवा मोदीभक्त आहे तो देशभक्त आहे असं नसतं. देशभक्त वेगळा असतो, त्याचं देशावर प्रेम असतं. तुम्ही म्हणाल तोच देशभक्त, असं मी मानणार नाही. मी मोदीभक्त होऊ शकत नाही, भाजपभक्त होऊ शकत नाही असं म्हणत देशभक्ती म्हणजे भाजपभक्ती नव्हे याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला. मी अस्सल मराठी बोलणारा हिंदू आहे, देशप्रेमी आहे हे महाराष्ट्राला मी दाखवलं पाहिजे असंही ते म्हणाले. आता आपण सगळे गुण्यागोविंदाने नांदत आहोत. आम्ही हा एकोपा ठेवायला बघतो आहोत. त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम भाजप करत आहे. तो मिठाचा खडा टाकणाऱयाला आता खडय़ासारखे बाजूला टाका असं आवहनही त्यांनी केलं.
दळिद्री राजकारण बाजूला ठेवा
त्याच मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सडेतोड उत्तर दिलं. मला वाटतं की या दळिद्री राजकारणाला बाजूला सारून महाराष्ट्राने एक वेगळी झेप घेतली पाहिजे, आजच्या काळाची ती गरजल आहे. नाहीतर ज्या महाराष्ट्राने आत्तापर्यंत देशाला दिशा दाखवली,तोच महाराष्ट्र आता यूपी किंवा बिहारपेक्षाही खाली जाईल. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जतनेते आता जागं रहावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.