अखेर प्रतीक्षा संपली, ठाणेकरांसाठी गुडन्यूज; तब्बल 40 कोटींचा निधी मंजूर
कलव्याला ४० कोटींच्या निधीने नवीन नाट्यगृहाची उभारणी होणार आहे. हे १२७०० चौरस मीटर जागेवर तळ आणि दोन मजल्यांचे असेल. ५०० पेक्षा जास्त आसनक्षमता, उपहारगृह आणि पार्किंगची उत्तम सुविधा असणार आहे. हे नाट्यगृह नाट्यप्रयोग, संगीत, आणि कला प्रदर्शनांसाठी उपयुक्त ठरेल.

कळवा आणि परिसरातील कलाप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून केवळ कागदावर असलेल्या कळव्यातील बहुप्रतिक्षित नाट्यगृहाच्या उभारणीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या संदर्भातील शासन निर्णय (जीआर) देखील जारी करण्यात आला आहे. यामुळे, या नाट्यगृहाच्या बांधकामाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
हे अद्ययावत नाट्यगृह कळव्यातील खारेगाव परिसरातील १२ हजार ७०० चौरस मीटर आरक्षित भूखंडावर उभे राहणार आहे. तळ अधिक दोन मजली असे हे नाट्यगृह असणार आहे. कळव्यात होणारे हे नाट्यगृह ठाण्यातील बाळगंधर्व रंगायतन आणि गडकरी रंगायतन यांच्यानंतर तिसरे नाट्यगृह ठरणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून खाडीपलीकडच्या कळवा, दिवा आणि मुंब्रा येथील नाट्य रसिकांना एखादा प्रयोग पाहण्यासाठी ठाण्यात जावे लागत होते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती. आता हे नाट्यगृह सुरू झाल्यानंतर त्यांची ही गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे परिसरातील कला आणि संस्कृतीला मोठी चालना मिळेल.
या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच या प्रकल्पाला गती मिळाली. तसेच निधी मंजूर झाला. तत्कालीन आयुक्त आर. ए. राजू यांच्या कार्यकाळात नाट्यगृह उभारणीचा निर्णय झाला होता. मात्र निधीअभावी हे काम थांबले होते. आता अखेर निधी मिळाल्याने हे काम लवकरच सुरु होणार आहे.
नाट्यगृहाची वैशिष्ट्ये
प्रस्तावित नाट्यगृहात नाट्य रसिकांसाठी अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत.
- आसन क्षमता: या नाट्यगृहात ४५० ते ५०० हून अधिक आसन क्षमता असेल.
- सुविधा: नाट्य रसिकांसाठी एक सुसज्ज उपहारगृह (Canteen) देखील असणार आहे.
- पार्किंग: वाहनांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, येथे १७५ चारचाकी आणि ८५ दुचाकी वाहने पार्क करता येणार आहेत.
कलाप्रेमींसाठी एक मोठे वरदान
दरम्यान या सर्व सुविधांमुळे कळव्यातील हे नाट्यगृह परिसरातील कलाप्रेमींसाठी एक मोठे वरदान ठरेल अशी अपेक्षा आहे. निधी मंजूर झाल्याने आता लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. हे नाट्यगृह केवळ नाट्यप्रयोगांसाठीच नाही, तर इतर सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिली आणि कला प्रदर्शन यांसारख्या विविध उपक्रमांसाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. कळवा परिसरातील स्थानिक कलाकारांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. हे नाट्यगृह सुरू झाल्यानंतर कळवा परिसरासाठी एक सांस्कृतिक केंद्र बनेल आणि येथील कलाप्रेमींना अभिमान वाटावा, असे एक ठिकाण उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.
