ठाण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, धाड-धाड गोळ्या घातल्याने खळबळ; तिघांची प्रकृती गंभीर

ठाण्यातील मुंब्रा येथे मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने तब्बल तिघांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेतला आहे.

ठाण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, धाड-धाड गोळ्या घातल्याने खळबळ; तिघांची प्रकृती गंभीर
thane mumbra firing
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 02, 2026 | 3:36 PM

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून बलात्कार, खून, चोरीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. काही प्रकरणांत तर निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या सर्व घटनांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. असे असतानाच आता ठाण्यातील मुंब्रा या भागात एक गंभीर घटना घडली आहे. येथे गोळीबाराची घटना घडली असून तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर आता रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर गोळ्या झाडणारा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेली ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बायपास परिसरातील आहे. बुधवारी ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. मुंब्रा बायपासवरील सुमैया ताई स्कूलजवळ किरकोळ वादातून एका युवकाने तब्बल 5 वेळा गोळ्या झाडल्या आहेत. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर तिघांनाही उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता तिघांवरही उपचार सुरू आहेत.

गोळीबाराचे नेमके कारण काय?

घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच ACP आणि DCP दर्जाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीसांच्या प्राथमिक तपासानुसार, गोळीबारामागे आपापसातील वाद असल्याचा असू शकतो. तसा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. मात्र या गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्याची मागणी

गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याच्या ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांकडून शोधमोहीम राबवली जात आहे. सध्या पोलीस परिसरातील CCTV फुटेज तपासत आहे. तसेच पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे. परंतु या घटनेनंतर परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. सध्या जखमी झालेल्यांवर उपचार सुरू असून त्यांचा जबाब घेतल्यानंतर या प्रकरणी नवा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us