Kalyan Crime : आरोपी विशाल गवळीचे 3 भाऊ सुद्धा तडीपार, डीसीपी अतुल झेंडे यांची मोठी कारवाई

कल्याण कोळसेवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीच्या तीन भावांना डीसीपी अतुल झेंडे यांनी 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे. आकाश, शाम, आणि नवनाथ गवळी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून परिसरात दहशत निर्माण करत असल्याने ठाणे, मुंबई, उपनगर, आणि रायगड जिल्ह्यांतून त्यांना हद्दपार करण्यात आलं आहे.

Kalyan Crime : आरोपी विशाल गवळीचे 3 भाऊ सुद्धा तडीपार, डीसीपी अतुल झेंडे यांची मोठी कारवाई
vishal gawali
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 17, 2025 | 8:21 PM

कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार आणि हत्या करणाऱ्या विशाल गवळी याच्या तीन भावांना आता कल्याण झोन तीन पोलीस उपयुक्त अतुल झेंडे यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. आकाश गवळी, शाम गवळी, आणि नवनाथ गवळी असे या तीनही आरोपींची नावे आहेत. या तिघांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तिघांना परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याने पुढील २ वर्षांसाठी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सदर गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यात सोडण्यात आले आहे.

कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश गवळी (33), शाम गवळी (34), आणि नवनाथ गवळी (28) या तिघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारख्या गुन्ह्यांमुळे त्यांनी चक्कीनाका परिसरात दहशत निर्माण केली होती. या तिघांच्या कारवायांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त होते.

या अनुषंगाने कोळसेवाडी पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ५५ नुसार तडीपारीचा प्रस्ताव डीसीपी अतुल झेंडे यांच्याकडे सादर केला होता. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर गवळी बंधूंना पुढील २ वर्षांसाठी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सदर गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यात सोडण्यात आले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी अशा सक्रिय गुन्हेगारांची यादी तयार केली असून भविष्यात आणखी कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

नेमकी घटना काय?

कल्याण पूर्वेत गेल्या महिन्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येची घटना समोर आली होती. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने पीडित अल्पवयीन मुलीचं अपहरण करत तिला घरी नेलं होतं. आरोपीने पीडितेवर अत्याचार केला होता. त्यानंतर तिची हत्या केली होती. आरोपीने हत्या केली तेव्हा त्याची पत्नी घरी नव्हती. ती एका खासगी बँकेत नोकरी करत असल्याने कामाला गेली होती. त्याची पत्नी संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याने तिला सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर मुलीच्या मृतदेहाचा बंदोबस्त कसा करायचा? याबाबत ते ठरवतात.

आरोपी त्याच्या मित्राला रिक्षा घेऊन बोलावतो. त्यानंतर ते मृतदेह बॅगेत भरुन कल्याण पश्चिमेला जावून बापगावात जावून एका निर्जनस्थळी फेकून दिलं होतं. या आरोपीच्या घराबाहेर असलेल्या रक्ताच्या डागावरुन पोलिसांनी घटनेची उकल केली होती. आरोपी त्याच्या सासरवाडीला शेगावला गेला होता. पोलिसांनी त्याच्या पत्नीला अटक केली होती. तिची चौकशी केल्यानंतर आरोपीला शेगावहून अटक केली होती.