काँग्रेसच्या जनजागरण पदयात्रेला कल्याणमध्ये मानापमानाचं ग्रहण; सेवा दलाने टाकला बहिष्कार

| Updated on: Nov 21, 2021 | 4:24 PM

महागाईच्या विरोधात काँग्रेसने संपूर्ण राज्यात जनजागरण पदयात्रा सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वातील ही पदयात्रा आज कल्याणमध्ये आली होती.

काँग्रेसच्या जनजागरण पदयात्रेला कल्याणमध्ये मानापमानाचं ग्रहण; सेवा दलाने टाकला बहिष्कार
congress worker
Follow us on

कल्याण: महागाईच्या विरोधात काँग्रेसने संपूर्ण राज्यात जनजागरण पदयात्रा सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वातील ही पदयात्रा आज कल्याणमध्ये आली होती. मात्र, या यात्रेत मानापमान नाट्य रंगलं. काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेवर बहिष्कार टाकल्याने काँग्रेसमधील सुंदोपसुंदी उघड झाली आहे.

नाना पटोले यांच्या नेतृत्वात कल्याणमध्ये जनजागरण पदयात्रा आली होती. मात्र, सेवा दलाने या पदयात्रेवर बहिष्कार टाकला आहे. रॅलीत प्रोटोकॉल पाळला जात नाही. केवल दादागिरी सुरू आहे, असा आरोप करत काँग्रेस सेवादल कार्यकर्त्यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. नाना पटोले यांनी या घटनेची दखल घेतली आहे. हा प्रकार माझ्यासमोर तर झाला नाही. असा काही प्रकार झाला असेल तर तपास करून योग्य ती कारवाई करू, असं पटोले यांनी सांगितलं.

महागाई विरोधात आकाशात काळे फुगे

दरम्यान, राज्यभरात काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात जनजागरण अभियान पदयात्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले हे कल्याणमध्ये आज पोहचले. कल्याणच्या सहजनानंद चौकात महागाई विरोधात आकाशात काळे फुगे सोडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, पदाधिकारी संतोष केणे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही यात्रा सहजानंद चौक ते बैलबाजार्पयत गेली.

पवार-फडणवीस वादात स्वारस्य नाही

काँग्रेसची भूमिका आम्ही वारंवार स्पष्ट केली आहे. कोणाच्याही व्यक्तिगत प्रश्नामध्ये काँग्रेस कधीही हस्तक्षेप करणार नाही. ही भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांच्या व्यक्तव्यामध्ये आम्हाला काही ही स्वारस्य नाही, असं पटोले म्हणाले.

भाजपमध्ये मोठी खदखद

विधान परिषदेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खदखद व्यक्त केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपमध्ये मोठया प्रमाणात खदखद सुरु आहे. हे तर स्पष्ट आहे. त्याचे परिमाण काय होणार हे पुढच्या काळात समजेल, असं सूचक विधान त्यांनी केलं.

सदाभाऊंनी गुजरातची परंपरा आणलीय का?

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना सैतान संबोधलं. त्यावरून पटोले यांनी सदाभाऊंना टोला लगावाल. ते पण मंत्री होते. आपण कोणावर या पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपणही आधी आपल्याला समजून घेतले पाहिजे. ही काही महाराष्ट्राची परंपरा नाही. गुजरातची परंपरा सदाभाऊनीं आणली असेल तर मला माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला.

निवडणुका पाहून महाराष्ट्राची बदनामी

काँग्रेसने क्रूझ पार्टीच्या बाबतजी भूमिका स्पष्ट केली तीच पूढे येत आहे. क्रूझ पार्टीत भाजपच्या लोकांच्या हात आहे. भाजपच्या लोकांनी हे प्रकरण ठरवून केले आहे. जेव्हा उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात निवडणूका येतात. तेव्हा भाजप महाराष्ट्राला प्रचाराचे साधन बनवून बदनाम करते. हे आपल्याला सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात दिसून आले. बिहारच्या निवडणूकीच्यावेळी सुशांतसिंहचे प्रकरण आणले होते. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केंद्र सरकारने थांबावे. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

 

संबंधित बातम्या:

12 तारखेची घटना निंदनीय, पण 13ची घटना त्यापेक्षाही निंदनीय, फडणवीसांचं विधान बेजबाबदारपणाचं; यशोमती ठाकूरांचा पलटवार

जरंडेश्वरप्रमाणेच खोतकरांचा घोटाळा, सोमय्यांचा आरोप; नांगरे-पाटलांची पत्नी, सासऱ्यांचेही घेतले नाव, चौकशीच्या मागणीसाठी उद्या दिल्लीला जाणार

उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, कलानी परिवाराच्या हाती सत्तेचा रिमोट कंट्रोल