MNS-BJP : कल्याण-डोंबिवलीत राज ठाकरेंच्या मनसेकडून सत्ताधारी भाजपला मोठा झटका
MNS-BJP : सध्या कुठल्याही निवडणुका नसताना कल्याण-डोंबिवलीत राज ठाकरेंच्या मनसेने सत्ताधारी भाजपला मोठा झटका दिला आहे. केडीएमसी क्षेत्रात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात मुख्य स्पर्धा आहे.

सध्या राज्यात कुठल्याही निवडणुका नाहीयत, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठा पक्ष प्रवेश पार पडला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षामध्ये इनकमिंग झालं. या निवडणूक काळात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. खासकरुन ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या मोठी होती. आता कुठल्या निवडणुका नसताना कल्याण-डोंबिवलीत मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं आहे. कल्याण-डोंबिवलीत महायुतीतील फोडाफोडीचा मनसेला फायदा झाला आहे. भाजपला धक्का देत मनसे पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांची घरवापसी झाली. मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि शहर अध्यक्ष हर्षद पाटील यांच्या नेतृत्वात पलावा कार्यालयात शेकडो पदाधिकाऱ्यांचा भव्य पक्षप्रवेश पार पडला.
भाजप खोटं हिंदुत्व गळ्यात मारून तरुणांचा वापर करते अशा शब्दात मनसे नेते राजू पाटील यांनी भाजपवर घणाघाती प्रहार केला. राजू पाटील हे कल्याण-डोंबिवलीतील मनसेचे मोठे नेते आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून निवडून आलेले ते एकमेव आमदार होते.
राजसाहेब बोलले ते दिसून येतय
दरम्यान माजी आमदार राजू पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. “मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने लढले, उपोषण केलं आम्ही त्यांचं समर्थन केलं. मी कित्येक सहकाऱ्यांना मराठवाड्यात जाण्यासाठी गाड्या करण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे. त्यांची इथे आंदोलन चाललेली असताना आम्ही तिथे जाऊन बसलो होतो” असं राजू पाटील बोलले.
“राजसाहेब जरांगेदादांना बोलले होते की, राकारणी निगरगट्ट आहेत. तुम्हाला फसवतील. नवी मुंबईत जीआर दिला त्याचं पालन झालं नाही. लोकसभेला जरांगेदादांनी हिसका दाखवल्यावर विधानसभेच्यावेळी गाजरं दाखवली. त्यांचा वापर करुन घेतला. वापर करुन घेतला असं म्हणणं योग्य होणार नाही, ते सूज्ञ आहेत. राजसाहेब बोलले ते दिसून येतय” असं राजू पाटील बोलले.