जितेंद्र आव्हाड यांच्या अटक आणि सुटकेची बातमी गुप्त का राहिली?, बातमी कशी फुटली?; वाचा सविस्तर

| Updated on: Oct 15, 2021 | 12:46 PM

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना काल अनंत करमुसे प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची लगेचच दहा हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटकाही करण्यात आली. (jitendra awhad arrested and granted bail, know details)

जितेंद्र आव्हाड यांच्या अटक आणि सुटकेची बातमी गुप्त का राहिली?, बातमी कशी फुटली?; वाचा सविस्तर
जितेंद्र आव्हाड
Follow us on

ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना काल अनंत करमुसे प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची लगेचच दहा हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटकाही करण्यात आली. मात्र, एवढ्या मोठ्या मंत्र्याला अटक झाली तरी कुणालाही त्याची गंधवार्ता नव्हती. कुठेही ब्रेकिंग न्यूज नव्हती. अगदी ठाण्यातील पत्रकारांनाही त्याची माहिती नव्हती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केल्यानंतर ही बातमी फुटली. एवढ्या मोठ्या नेत्याच्या अटकेची बातमी लपून राहिलीच कशी? त्यावर टाकलेला हा प्रकाश.

ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्यांना दुपारी 4.30 वाजता कोर्टात हजर करण्यता आलं. मूळ एफआयआरमध्ये त्यांचं नाव नव्हतं. त्यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचे आरोप करण्यात आले होते. कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडून देण्यात आलं.

अन् बातमी फुटली

आव्हाड पोलीस ठाण्यात आले. तासभर त्यांचा जबाब नोंदवला गेला. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात सुनावणी झाली आणि त्यांना दहा हजाराच्या जातमुचलक्यावर जामीनही मिळाला. तोपर्यंत कुणाला त्याची माहितीही नव्हती. अगदी कोर्ट बीट आणि क्राईम रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांनाही त्याची गंधवार्ता नव्हती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, ही बातमी फुटली तीही केवळ राजकीय नेत्यामुळेच. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामुळे. सोमय्या यांनी रात्री 9.30 वाजता ट्विट करून आव्हाड यांच्या अटकेची माहिती दिली.

काय होतं ट्विट?

सोमय्या यांनी काल ट्विट केलं होतं. अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर पत्रकारांची एकच धावपळ सुरू झाली आणि बातमी फुटली.

गोपनीयते मागचं कारण काय?

आव्हाड यांच्या अटकेची बातमी इतकी गोपनीय कशी राहिली यावर अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. काहींच्या मते, पत्रकारांना ही बातमी कळली नसली तरी वरिष्ठ नेतृत्वाला मात्र त्याची माहिती असेल. एखाद्या मंत्र्याला अटक करायची म्हटल्यावर चर्चा करून नंतरच निर्णय घेतला असेल. फक्त वरिष्ठ पातळीवरून बातमी लिक होऊ देऊ नये म्हणून काळजी घेतली असेल. मात्र, ही बातमी उजेडात आणण्यात पत्रकार कमी पडले हे मात्र नक्की.

आव्हाड हे मंत्री आहेत. त्यामुळे मीडियात हे प्रकरण गाजू नये म्हणून तिन्ही पक्षातील नेत्यांनी आणि पोलिसांनीही ही बातमी गुप्त ठेवली असावी, असंही काहींचं म्हणणं आहे.

काय आहे प्रकरण?

आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनीअर तरुणाने केला केला होता. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता. नंतर या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते. याच प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे.

 

संबंधित बातम्या:

क्या हुआ तेरा वादा? पुण्यात राष्ट्रवादी भाजपला वायद्यांची आठवण करुन देणार

Sameer Wankhede | मोठी बातमी ! समीर वानखेडेंना मुंबई पोलिसांचं समन्स, हेरगिरीप्रकरणात चौकशी होणार

Aryan Khan Bail | आर्यन खानचा मुक्काम कोठडीतच ! न्यायालयाने निकाल राखून ठेवला, 20 ऑक्टोबरला निर्णय

(jitendra awhad arrested and granted bail, know details)