‘आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा’, राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टीका

आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर असलेले अनेक फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे शहरातील विविध पेट्रोल पंपांच्या बाहेर लावले आहेत.

'आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा', राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टीका
'आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा', राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टीका

ठाणे : आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर असलेले अनेक फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे शहरातील विविध पेट्रोल पंपांच्या बाहेर लावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर गगनाला भिडू लागले आहेत. एकीकडे महागाईने उच्चांक गाजलेला असतानाच भाजपने जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. या यात्रेद्वारे महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद मागितला जाणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र, इंधनाचे दर गगनाला भिडत असताना जनतेचा आशीर्वाद कोणत्या तोंडाने मागितला जात आहे? असा सवाल करीत हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीच्या होर्डिंग्जवर नेमकं काय लिहिलं?

ठाणे शहरातील सर्वच पेट्रोल पंपांच्या बाहेर असे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यावर भाजपची जनआशीर्वाद यात्रा, पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले, आधी केलेलं पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर छापून इंधनाचे दरपत्रकही छापण्यात आले आहे.

आनंद परांजपे यांचा भाजपवर घणाघात

या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली. “16 ऑगस्टपासून ठाणे जिल्ह्यात भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी दरवर्षाप्रमाणे अनेक खोट्या घोषणा केल्या. महागाई कमी करु, शंभर लाख कोटींची गुंतवणूक करुन रोजगार निर्मिती करु, अशी आश्वासने दिली. पण, वस्तूस्थिती अशी आहे की, दोन दिवसांपूर्वी जो गॅस सिलिंडर 834 रुपये होता, तो आता 25 रुपयांनी वाढून 859 रुपये 90 पैसे झाला आहे. पेट्रोल 108 तर डिझेल 98 रुपयांवर गेले आहे. त्यामुळे लोकांमध्ये जाऊन लोकांचा खोटा आशीर्वाद घेण्याचे काम भाजप करीत आहे”, असा घणाघात परांजपे यांनी केला.

‘जनआशीर्वाद यात्रेला सामान्य लोक शिव्याच घालत आहेत’

“कोविडच्या काळात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अथक प्रयत्न करीत असतानाच त्याला खो घालण्याचे काम जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून करीत आहे. त्यामुळे त्यांनी ही यात्रा रद्द करावी. महागाईचा भडका कमी करावा आणि लोकांचे आशीर्वाद घ्यावेत. आता यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सामान्य लोक शिव्याच घालत आहेत, याची त्यांना जाणीव करुन देण्यासाठीच हे होर्डिंग्ज लावलेले आहेत”, असं आनंद परांजपे म्हणाले.

जनआशीर्वादेतील नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

“या प्रसंगी आपण ठाणे पोलिसांनाही विनंती करीत आहे की, संपूर्ण ठाण्यात कोविड नियमांचे उल्लंघन करुन भाजपचे जे काही नेते फिरले, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत; केवळ कोपरीच नव्हे तर ते ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फिरले त्या सर्वच पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत”, अशी मागणी परांजपे यांनी केली.

हेही वाचा :

स्थायी समिती अध्यक्षच लाचलुचपतच्या ताब्यात!, भाजपचा खरा चेहरा समोर, राष्ट्रवादीचा हल्लाबोल

तुफान गर्दीमुळे कोरोना नियमांची पायमल्ली, टीका होताच युवासेनेचे सर्व मेळावे रद्द, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर निर्णय

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI