Ganeshotsav : गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी मनसेकडून मोफत बस, एक्सप्रेसही सोडणार; नोंदणीसाठी चाकरमान्यांची रिघ

| Updated on: Aug 07, 2022 | 8:50 PM

दरम्यान, यंदा कोकणसाठी विशेष 'मनसे एक्सप्रेस' देखील मोफत सोडण्याचा संकल्प ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बोलून दाखवला, अशी माहिती मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली.

Ganeshotsav : गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी मनसेकडून मोफत बस, एक्सप्रेसही सोडणार; नोंदणीसाठी चाकरमान्यांची रिघ
गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी मनसेकडून मोफत बस
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

ठाणे : कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने गौरी-गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या चाकरमान्यांचा उत्साह यंदा द्विगणित झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कोकणवासीयांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आहे. गणेशोत्सवा (Ganeshotsav)साठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या ठाण्यातील चाकरमान्यांसाठी मनसेकडून तब्बल 100 बसेस मोफत (Free Buses) सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, यंदा कोकणसाठी विशेष ‘मनसे एक्सप्रेस’ (MNS Express) देखील मोफत सोडण्याचा संकल्प ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बोलून दाखवला, अशी माहिती मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली.

मनसे मध्यवर्ती कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन

गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे कोकणवासिय आपल्या गावच्या विविध सण-उत्सवांना मुकले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असला तरी, नियम शिथिल करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जाणार आहेत. मात्र, गणेशोत्सवाच्या चार महिने आधीच कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांसमोर गावी कसे जायचे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गणेशभक्तांच्या मदतीला धावली आहे. गणपतीला जाऊ इच्छिणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील चाकरमान्यांसाठी मनसे 100 मोफत बसेस सोडणार आहे. यासाठी ठाण्यातील गणेशभक्तांना महाड, खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, साखरपा, राजापूर, कणकवली, देवगड, मालवण, सावंतवाडी, सुधागड-पाली तसेच पश्चिम महाराष्ट्रात सांगली-सातारा येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध असून गणेशभक्तांनी मनसे मध्यवर्ती कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे.

सातारा-सांगलीसाठीही बसेस सोडण्यात येणार

मनसेमार्फत कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची नौपाड्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयात अर्ज घेण्यासाठी झुंबड उडत आहे. 12, 13, 14 ऑगस्ट रोजी अर्ज स्विकारण्यात येतील. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठीच ही मोफत बस सेवा उपलब्ध असून अर्जासोबत प्रवाशांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. एकदा बुकिंग केल्यानंतर तारीख बदलता येणार नाही. 27, 28 आणि 29 ऑगस्ट रोजी बसेस ठाण्यातून रवाना होतील. तर, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यातील ठाणेकरांसाठीही यंदा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिली. (On the occasion of Ganeshotsav MNS will also run free buses and express for Konkan)

हे सुद्धा वाचा