Thane Police: हँडसेट बदलताच ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप हॅक, अश्लील व्हिडिओ अन्… आता अपडेट काय?
Thane Police Commissioner WhatsApp Account Hack SIT: ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप हॅक करण्यात आले होते. याप्रकरणी आता विशेष तपास पथकाकडून तपास करण्यात येणार आहे. या घटनेने राज्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Thane Police Commissioner WhatsApp Account Hack SIT: ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप हॅकप्रकरणात पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात अगोदरच माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून तपास करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोमवारी मोबाइल हॅण्डसेट बदलला होता. तो मंगळवारी अज्ञात सायबर भामट्याने हॅक केला. त्यावर काही काळ अश्लील व्हिडिओ देखील त्याने पाठविले. या घटनेने राज्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तपासाची सूत्रं आता एसआयटीच्या हाती असतील.
तपासासाठी एसआयटी स्थापन
महाराष्ट्र सायबर सेल या प्रकरणाचा तपास करणार आहे. हॅकिंगमागील सूत्रधार कोण, आयुक्तांचे खातेच का लक्ष्य करण्यात आले आणि आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करण्यामागचा हेतू काय? या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी सहा जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या एसआयटी पथकात दोन वरिष्ठ अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस उपायुक्त पराग मणेरे आणि ठाणे सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश वारके यांच्याकडे तपासाची धुरा राहणार आहे.
हँडसेट बदलला आणि मोबाईल हॅक
पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोमवारी मोबाइल हॅण्डसेट बदलला होता. तो मंगळवारी अज्ञात सायबर भामट्याने हॅक केला. त्यावर काही काळ अश्लील व्हिडिओ देखील त्याने पाठविले. मंगळवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर आला. याप्रकरणी सायबर पोलिसांकडून पथकांची निर्मिती करून त्याचा तपास करण्यात येत आहे. याबाबत ठाणे पोलिसांकडून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
पोलिसांसमोरच सायबर भामट्यांचे मोठे आव्हान
पोलिस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याने महाराष्ट्र पोलिस दलात एकच खळबळ उडाली. सायबर भामट्यांनी थेट पोलिसांनाच मोठे आव्हान दिल्याचे मानले जात आहे. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. खाते हॅक करणाऱ्यांचा शोधच नव्हे, तर त्यामागील तांत्रिक यंत्रणा आणि संभाव्य हेतू उघड करण्यावर एसआयटीकडून भर दिला जाईल. या तपासातून सायबर सुरक्षेतील त्रुटी व भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
