राष्ट्रवादी पक्ष- चिन्हानंतर आता कार्यालयावर ताबा घेणार का?; अजित पवार गटाच्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

| Updated on: Feb 28, 2024 | 2:58 PM

Ajit Pawar Group Leader Anand Paranjape on NCP Office : पवारसाहेबांच्या आशीर्वादाने भाजपसोबत झालेल्या 'त्या' बैठकांना काय म्हणायचं?; अजित पवार गटाच्या नेत्याचा सवाल... राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दावा केला जाणार का? या विषयीदेखील अजित पवार गटाच्या नेत्याने भाष्य केलंय. वाचा...

राष्ट्रवादी पक्ष- चिन्हानंतर आता कार्यालयावर ताबा घेणार का?; अजित पवार गटाच्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं
Follow us on

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | 28 फेब्रुवारी 2024 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर अजित पवार गट राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावर दावा करणार का? अशी चर्चा होऊ लागली. यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमची तुतारी तुम्हीच पुन्हा रायगडला जाऊन वाजवा. राष्ट्रवादीचा कार्यालय ताब्यात घेण्याचा आमचा कुठलाही विचार झालेला नाही. शासनाने तुम्हाला ते कार्यालय दिलेलं आहे. तसंच आम्हाला आमचं कार्यालय दिलं आहे, असं आनंद परांजपे म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांना सवाल

जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळातून बाहेर येऊन प्रतिक्रिया दिली की, शरद पवार साहेबांची आम्ही गद्दारी केली. आम्ही त्यांचा पक्ष चिन्ह हिसकावून घेतला. कार्यालयात घुसून आम्ही आता कार्यालय ताब्यात घेणार आहोत. माझा जितेंद्र आव्हाड यांना एक प्रश्न आहे की, शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने संमतीने 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीची आकडेवारी येत असताना आम्ही बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला. याला काय म्हणायचं?, असा सवाल आनंद परांजपे यांनी विचारला आहे.

“त्या बैठकांचं काय?”

2016 ते 2019 मध्ये अनेक बैठका भाजपच्या नेतृत्वाबरोबर झाल्या, शरद पवार साहेबांच्या आणि आशीर्वादाने झाल्या याला काय म्हणायचं? ज्या जितेंद्र आव्हाड यांनी सामना पेपर जाळला. शिवसेना विरुद्ध अनेक आंदोलन केली. 2019 मध्ये त्याच शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीमध्ये सत्तेत आम्ही सामील झालो मग याला काय म्हणायचं?, असं म्हणत आनंद परांजपे यांनी आव्हाडांना प्रश्न विचारलेत.

शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय

2 जुलैला ज्यावेळी आम्ही शपथविधी घेतली. रात्री दोन वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे डिस्कक्वालिफिकेशन पिटीशन आपण टाकलं. निवडणूक आयोगासमोर दोन-तीन महिने सुनावणी झाली. त्यानंतर निर्णय आम्हाला मिळाला. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष दिला. पक्षचिन्ह दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला, असंही आनंद परांजपे म्हणाले.