शिवतारेंचं विधान, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा; म्हणाले, आम्ही कल्याणमध्ये…

| Updated on: Mar 12, 2024 | 1:59 PM

Anand Paranjpe on Vijay Shivtare Baramati Loksabha Election 2024 : बारामतीतून लढण्याचा निर्धार करणाऱ्या विजय शिवतारेंना राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा; नेमकं काय म्हणाले...? कल्याण लोकसभेच्या जागेवर आम्ही लढू शकतो, असा इशारा राष्ट्रवादीने शिवसेनेला दिला आहे. वाचा सविस्तर...

शिवतारेंचं विधान, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा; म्हणाले, आम्ही कल्याणमध्ये...
Follow us on

ठाणे | 12 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतीलच नेत्याने अजित पवार यांना चॅलेंज दिलंय. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भाष्य केलंय. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असा इशाराच त्यांनी दिलाय. याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी उत्तर दिलं आहे. काल शिवसेनेचे शिवराळ नेते शिवतारे यांनी अत्यंत चुकीची प्रतिक्रिया अजितदादांना बद्दल दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं. अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे खूप सोपं आहे. तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निकाल कल्याण लोकसभेवर लागू शकतो, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना इशारा

2019 ला लोकसभेला त्या मतदार संघात मोठ्या मतधिक्क्याने राष्ट्रवादीचा विजय झाला. बारामती लोकसभा मतदार संघ सातत्याने विकास कामांसाठी राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे. शिवतारे वैयक्तिक अजेंडा जर चालवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य ती समज दिली पाहिजे.  महायुतीचे चांगले वातावरण राहावं, असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर, आपले वाचाळवीर विजय शिवतारेना समजवावं. आमच्या शक्ती स्थळांवर कोणी घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेवर वेगळ चित्र दिसू शकतं, असा थेट इशारा आनंद परांजपे यांनी शिंदेंना दिलाय.

परांजपे काय म्हणाले?

असे अनेक मतदारसंघ आहेत. ज्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते वातावरण गढूळ करू शकतात. त्यावेळी आमचे श्रद्धास्थान शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका तत्कालीन मंत्री विजय शिवतारे यांनी केली त्याला प्रती आव्हान अजित दादांनी केलं होतं. तुझं आवाका किती तू बोलतोस किती यावेळेला बघतो कसा आमदार होतो शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्यावर असे आव्हान अजित दादांनी केलं होत. महाराष्ट्राला माहित आहे अजित दादा जे बोलतात ते करून दाखवतात, असं परांजपे यावेळी म्हणाले.

जागावाटप कधी?

महायुतीचं जागावाटप कधी होणार? यावर आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली. लवकरच सन्मानपूर्वक प्रत्येक पक्षाला जागा मिळून महायुतीचा फॉर्म्युला येईल काळजी करण्याचे कारण नाही. राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावर लढतील, असं आनंद परांपजे म्हणालेत.