Thane-KDMC Election 2026 : महायुतीच्या विरोधात पहिली ठिणगी ठाण्यात, कल्याणमध्ये काँग्रेसला धक्का

Thane-KDMC Election 2026 : महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच पक्षांतरं आणि वाद-विवाद सुरु झाले आहेत. महायुतीमध्ये वादाची पहिली ठिणगी ठाण्यात पडली आहे. शिवसेना-भाजप युती म्हणून पालिका निवडणुका एकत्र लढवणार आहे.

Thane-KDMC Election 2026 : महायुतीच्या विरोधात पहिली ठिणगी ठाण्यात, कल्याणमध्ये काँग्रेसला धक्का
Eknath Shinde
Image Credit source: PTI
| Edited By: | Updated on: Dec 18, 2025 | 9:29 AM

नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुका स्वतंत्रपणे लढणारे शिवसेना-भाजप राज्यातील महापालिका निवडणुका मात्र महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्यातील महापालिका निवडणुकीकरीता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना महायुतीची घोषणा केली होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांचा हा निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याना न रुचल्याने या युती विरोधात पहिली ठिणगी ठाण्यात पडली आहे. भाजप कोपरी मंडळच्या वतीने शिवसेना पक्षाशी युतीबाबत हरकत नोंदविण्यात आली आहे. कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेने यापूर्वी केलेल्या कुरघोडींचा पाढाच जाहीर पत्रकार परिषदेत वाचला. तसेच याबाबतचे निवेदन ठाणे निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर, आमदार ॲड. निरंजन डावखरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांना देखील पाठवल्याने युतीत नाराजीचे संकेत मिळत आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कल्याणमध्ये येणार आहेत. यावेळी काँग्रेस, मनसेचे माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी निवडणूक प्रचार प्रमुख, माजी नगरसेवक सचिन पोटे आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका जानवी पोटे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी जाहीर पक्षप्रवेश होणार आहे.

काँग्रेसला धक्का 

कल्याण पूर्वेतील कै.दादासाहेब गायकवाड क्रीडागणात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश सोहळा पार पडणार आहे. सचिन पोटे यांनी वरिष्ठांच्या दबाव आणि नेतृत्वविरोधात नाराजगी व्यक्त करत काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर मनसेचे नेते कौस्तुभ देसाई आणि त्यांची पत्नी कस्तुरी देसाई देखील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवलीत आज शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहेत.

युती एकदिलाने काम करेल का?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढच्या काही दिवसात राज्यात मोठ्या राजकीय उलथा-पालथी पहायला मिळणार आहेत. कल्याण-डोंबिवली हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे मुख्य चुरस शिवसेना-भाजपमध्येच आहे. त्यामुळे केडीएमसी, ठाण्यात शिवसेना-भाजप युती एकदिलाने काम करेल का? हा मुख्य प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंना रोखणं हा महायुतीचा मुख्य उद्देश आहे.