दादांनी मुद्दामून फोन उचलला नाही, कष्टाची हिच किंमत असेल तर…; महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला मोठे खिंडार
कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का बसला आहे. महिला शहराध्यक्षा मंदा पाटील आणि कस्तुरी देसाई यांनी राजीनामा दिला असून, माजी आमदार राजू पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलेले असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. मनसे पक्षाचे आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या दोन महिला शहराध्यक्ष आणि त्यांच्या समर्थकांनी एकाच दिवशी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मनसेला मोठे भगदाड पडले आहे. डोंबिवलीतून मंदा पाटील आणि कल्याणमधून कस्तुरी देसाई यांच्यासह त्यांचे पती मनसे नेते कौस्तुभ देसाई यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
मंदा पाटील काय म्हणाल्या?
डोंबिवलीतील आक्रमक महिला चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदा पाटील यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देताना त्यांनी पक्षांतर्गत राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. माझ्या घरात पुतण्याच्या लग्नाचा विधी सुरू असताना मला सोशल मीडियावरून समजले की, माझा राजीनामा न घेताच माझ्या जागी नवीन शहराध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या १२ वर्षांपासून अत्यंत बिकट परिस्थितीत मी डोंबिवलीत मनसे जिवंत ठेवली. अनेक वेळा पतीलाही संघर्षात साथ दिली. निवडणुकीत निसटता पराभव होऊनही पक्ष सोडला नाही. मात्र, आता माजी आमदार राजू पाटील माझा फोन उचलत नाहीत आणि मेसेजला उत्तर देत नाहीत. जर माझ्या निष्ठेची हीच किंमत असेल, तर मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे मंदा पाटील यांनी म्हटले.
देसाई दाम्पत्यांचा रामराम
तर दुसरीकडे कल्याणमध्ये राजू पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे कौस्तुभ देसाई आणि महिला शहराध्यक्षा कस्तुरी देसाई यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपला राजीनामा जनतेच्या हितासाठी असल्याचे स्पष्ट केले. वॉर्डातील विकासकामे करण्यासाठी आणि निधी उपलब्ध करून घेण्यासाठी मनसेत राहून अडचणी येत होत्या. प्रभागातील जनतेचे प्रश्न सुटावेत आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योग्य दिशा मिळावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्हाला भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून मोठ्या ऑफर्स आहेत, त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, असे देसाई दाम्पत्याने म्हटले.
दरम्यान एकाच वेळी दोन महत्त्वाच्या शहराध्यक्षांनी पद सोडल्यामुळे मनसेचे स्थानिक नेतृत्व, विशेषतः माजी आमदार राजू पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना आता उघडपणे समोर येत आहे. राजीनामा दिलेल्या दोन्ही गटांनी त्यांचे पुढील पत्ते अद्याप पूर्णपणे उघड केलेले नाहीत. यामुळे या महिला नेत्या आता शिंदे गटाच्या शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
