Ambernath Crime: अंबरनाथ हादरले, एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा चाकूहल्ला, पोटावर, हातावर आणि चेहऱ्यावर सपासप वार, आरोपी फरार
Ambernath Crime: कामावरून परतणाऱ्या तरुणीवर एका तरूणाने, एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला केला. अंबरनाथमध्ये या घटनेने खळबळ उडाली. या हल्ल्यात तरुणी जखमी झाली आहे. तर आरोपी हेमंत गुमाणे हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Ambernath Crime: अंबरनाथच्या हाऊसिंग बोर्ड परिसरातील गुरुद्वारासमोर शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. विशाखा गायकवाड ही कामावरून घरी येत असताना आरोपी हेमंत गुमाणे याने तिला गुरुद्वारासमोर गाठून तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विशाखाच्या पोटावर, हातावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. तिला नागरिकांनी ताताडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गुमाने हा फरार असून पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या गंभीर हल्ल्यामुळे अंबरनाथ परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार
या घटनेनंतर जखमी विशाखाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी हेमंत गुमाणे फरार झाला असून त्याच्या शोधासाठी अंबरनाथ पोलिसांनी चार पथकं रवाना केली आहेत. तर गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास सुरू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या गंभीर हल्ल्यामुळे अंबरनाथ परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
अंबरनाथमध्ये गुन्हेगारीच्या घटना
अंबरनाथमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यास विरोध केल्याने पती-पत्नीवर हल्ला करण्यात आला होता. तर पार्सल डिलिव्हरीच्या वादातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करण्यात आली होती. अंबरनाथमध्ये पार्सलची ऑर्डर रद्द केल्याच्या कारणावरून डिलिव्हरी बॉयने वयोवृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तरुणालाही दुसऱ्या दिवशी बोलावून डिलिव्हरी बॉयने आपल्या साथीदारांसह बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुणाच्या डोळ्याला आणि गालाला गंभीर दुखापत झाली आहे. अंबरनाथ पूर्वेतील बी केबिन रोडवरील शारदा अपार्टमेंटमध्ये घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
