Chandrakant Patil : गोकुळच्या निवडणुकीत मतचोरी? सतेज पाटील यांचे नाव घेत चंद्रकांत पाटील यांचा खळबळजनक आरोप
Chandrakant Patil on Satej Patil: देशात वोट चोरीचा मुद्दा गाजत असतानाच आता गोकुळ निवडणुकीतही मत चोरी झाल्याचा आरोप विरोधकांनी नाही तर सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर हा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.

Chandrakant Patil on Satej Patil: सध्या देशात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी SIR, वोट चोरीवरून रान पेटवले आहे. त्याचवेळी गोकुळ निवडणुकीतही मत चोरी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर हा आरोप केला आहे. सतेज पाटील यांनी मत चोरी करून 13 संचालक निवडून आणल्याचा ठपका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठेवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला तर सतेज पाटील यांच्याविरोधात कोल्हापुरातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवून त्यांचा पराभव करण्याचे आव्हानही त्यांनी दिले.
महायुतीच्या ठरावांची मतचोरी
सतेज पाटील यांनी महायुतीकडे असलेल्या ठरावांची मतचोरी केली आणि 13 संचालक निवडून आणल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. मुद्दाला बळकटी देण्यासाठी त्यांनी मतांचं गणित उलगडले. प्रत्येक गावातील मान्यता असलेल्या डेअरी संचालकांनी एक ठराव द्यायचा असतो. गोकुळ निवडणुकीसाठी 5400 ठराव अंतिम झाले होते. त्यात महायुतीच्या बाजूने 4400 आणि सतेज पाटील यांच्या बाजूने 900 ठराव होते. पण महायुतीमध्ये काही वर्चस्वासाठी वाद होते. या अतंर्गत दुफळीचा फायदा घेण्यात आला. तसा प्रचार करण्यात आला. आमच्या मतांची संख्या 4400 वरून थेट 2700 ते 2800 अशी घसरली. म्हणजे सतेज पाटील यांनी आमची मतं चोरली असा दावा चंद्रकांतदादांनी केला.
गोकुळनंतर सतेज पाटील दुष्काळी मदतीसाठी आक्रमक
गोकुळ निवडणुकीत विरोधी बाकांवर बसावे लागल्यानंतर आता आमदार सतेज पाटील यांनी नवीन मुद्दा हाती घेतला आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील दुष्काळी यादीत वंचित तालुक्यांचा समावेश करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे. राज्यातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचा तात्काळ समावेश करावा आणि शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन न देता सरसकट पीक कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
राज्य शासनाने यावर त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवून आपण स्वतः शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला. गडहिंग्लज येथे दुष्काळग्रस्त संघर्ष समितीने पुकारलेल्या सर्वपक्षीय मोर्चा आणि आंदोलनात सहभाग घेत त्यांनी हा इशारा दिला आहे. गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत तात्काळ समावेश करावा , या मागणीसाठी गेले काही दिवस आंदोलन सुरू आहे. गुरुवारी दुष्काळग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शहरातून मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील दसरा चौकात हा मोर्चा आल्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला, त्यात आमदार सतेज पाटील यांनी या आंदोलनात सहभाग झाले होते.
