दोन मंदिर एक मूर्ती, उस्मानाबादच्या अणदूर येथील श्री खंडेरायाच्या पालखीचे नळदुर्ग मैलारपूरकडे प्रस्थान
श्री खंडेरायाच्या श्रीच्या पालखीचे आज नळदुर्ग मैलारपूरकडे प्रस्थान झाले आहे. उद्या पहाटे पाच वाजता मैलारपूर मंदिरात खंडोबाचे आगमन होऊन तेथे विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल. अणदूरच्या यात्रेनिमित्त खंडोबाच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

उस्मानाबाद: ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजराने , खोबरं- भंडाऱ्याची उधळण करीत उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील श्री खंडोबाची यात्रा पारंपारिक पद्धतीने मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. श्री खंडेरायाच्या श्रीच्या पालखीचे आज नळदुर्ग मैलारपूरकडे प्रस्थान झाले आहे. उद्या पहाटे पाच वाजता मैलारपूर मंदिरात खंडोबाचे (Khandoba) आगमन होऊन तेथे विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल. अणदूरच्या यात्रेनिमित्त खंडोबाच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
खंडोबा आणि बाणाईचे विवाहस्थळ
याविषयीची विशेष आख्यायिका आहे. श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे. महाराष्ट्रात खंडोबाची 8 प्रमुख ठिकाणे आहेत. त्यापैकी अणदूर-मैलारपूर (नळदूर्ग) हे महत्त्वाचे स्थान आहे. दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग येथे झाला होता. म्हणून या स्थानाला महत्त्व आहे.
दोन मंदिरे, मूर्ती एक, शेकडो वर्षांची परंपरा
या खंडोबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अणदूर आणि मैलारपूर या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत. यातील अंतर 4 किलोमीटरचे आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. मंदिरे दोन पण मूर्ती एक अशी शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. तसेच अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अणदूरला देवाची मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यांमध्ये लेखी करार केला जातो, हे विशेष!
इतर बातम्या-
