ज्यांनी ठाकरे, पवार युती केली; त्या व्यक्तीनेच राज, उद्धव ठाकरेंना पुन्हा एकत्र आणलं, सूत्रधार कोण?

आज मुंबईमध्ये विजय मेळावा झाला, या मेळाव्यात तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं.

ज्यांनी ठाकरे, पवार युती केली; त्या व्यक्तीनेच राज, उद्धव ठाकरेंना पुन्हा एकत्र आणलं, सूत्रधार कोण?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2025 | 9:03 PM

आज मुंबईमध्ये विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकाच मंचावर आले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मला 100 टक्के खात्री आहे. तसं नसतं तर हा सोहळा पार पडला नसता. पहिल्या रांगेतही ठाकरे आहेत. दोन्ही कुटुंब बसले होते. मी राखणदार आहे. मागे बसलो होतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

राज ठाकरे यांचा आणि माझा कायम संवाद राहिला. हा संवाद राहिल्यामुळेच हे सर्व घडू शकलं. संवाद पाहिजे राजकारणात जे टीकाकार आहेत, ज्यांच्याशी मतभेद आहेत, त्यांच्याशी उत्तम संवाद करण्याला राजकारण म्हणतात. मित्र म्हणून, सहकारी म्हणून, भाऊ म्हणून माझा कायम संवाद राहिला, तो संवाद कायम राहिला पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सूत्रधार वगैरे काही नसतं. आम्ही राजकारणात आहोत. समाजकारणात आहोत. पक्षात आहोत. कुटुंबासोबत आहोत. आम्ही ठाकरेंसोबत आहोत जन्मत:च. कुठे काही मिठाचा खडा पडला असेल तर तो काढण्यासाठी आमचा प्रयत्न कामी पडत असेल तर आम्ही तो प्रयत्न केला. सुदैवाने दोन्ही ठाकरेंशी मी त्याच प्रेमाने बोलू शकतो. बोलत राहिलो. त्यातून आजचं चित्र राहिलं, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मला वाटतं की आम्ही आज सण साजरा करत आहोत. नक्कीच आनंदाचा क्षण आहे. प्रत्येक मराठी घराघरात या निमित्ताने गोडधोड होत असेल. सण होत असेल. मला घरामध्ये सांगितलं आज इतका मोठा कार्यक्रम होत आहे. आपल्यासाठी आनंदाचा सण आणि क्षण आहे. तुम्ही त्यासाठी सुंदर एक कोट घालून जा. हे मला घरच्यांनी सांगितलं. प्रत्येकाच्या घरातील याच भावना आहेत, असंही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.  दरम्यान दुसरीकडे त्यावेळी महाविकास आघाडी घडून आणण्यामध्ये देखील राऊतांची मोठी भूमिका राहिली आहे.