ऐन उन्हाळ्यात आभाळच फाटलं… अवकाळीच्या दणक्याने द्राक्षांपासून आंब्यांपर्यत नुकसानच नुकसान

ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आभाळ फाटलं. अवकाळी पावसाने आंबा आणि द्राक्ष बागांचं मोठं नुकसान. हवामान खात्याकडून पुढील 24 तासांसाठी अलर्ट जारी.

ऐन उन्हाळ्यात आभाळच फाटलं... अवकाळीच्या दणक्याने द्राक्षांपासून आंब्यांपर्यत नुकसानच नुकसान
| Updated on: Jan 27, 2026 | 11:47 AM

Weather Update :  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी मंगळवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्याचं समोर आलंं. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. शहादा शहरासह परिसरात अचानक जोरदार पावसाची बॅटिंग झाली असून जिल्ह्याच्या विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या. सोमवारी रात्री झालेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा संकटात सापडला असून, रब्बी हंगामातील पिकांचे संपूर्ण गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पपई, गहू आणि हरभरा या पिकांना सर्वाधिक धोका निर्माण झाला असून अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने खराब होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

आंबा आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान

दरम्यान, सातपुडा पट्ट्यातील आंबा आणि कैरी उत्पादक शेतकरीही मोठ्या संकटात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी मोहरांनी बहरलेली आंब्याची झाडे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर मोहर गळून जमिनीवर पडल्याचे दिसून आले आहे. आंब्याचा मोहर गळून पडल्यास यंदा आंबा आणि कैरीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असून याचा थेट फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

याशिवाय, गेल्या पावसाळ्यात तब्बल सहा महिने सतत पडलेला पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 50 ते 60 टक्क्यांहून अधिक द्राक्ष बागा बाधित झाल्याचे चित्र आहे. त्यातच सध्या जाणवणारी थंडी आणि गेल्या महिन्याभरापासून कायम असलेले ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

ठाण्यात पावसाच्या सरी

ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे रस्ते ओले चिंब झाले असून हवेत गारवा वाढला आहे. या पावसामुळे वातावरणात अचानक बदल जाणवू लागला आहे. हवामान खात्याने याआधीच ठाणे आणि परिसरात पावसाचा इशारा दिला होता.

दरम्यान, हवामान खात्याने यापूर्वीच विविध भागांत पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. जिल्ह्यात सातत्याने वातावरणात बदल होत असून गेल्या महिन्याभरापासून ढगाळ वातावरण कायम आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे.