राज्यातील सर्वपक्षीय 11 खासदारांचा पत्ता कट

  • Updated On - 4:06 pm, Fri, 5 July 19 Edited By:
राज्यातील सर्वपक्षीय 11 खासदारांचा पत्ता कट

मुंबई : राज्यातील 48 खासदारांपैकी विद्यमान 11 खासदारांचं तिकीट सर्वच पक्षांनी कापलंय. यात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने सात विद्यमान खासदारांचं तिकीट कापलंय. तर राष्ट्रवादीने दोन विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलं. शिवसेना आणि काँग्रेसनेही एका विद्यमान खासदारांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे या नव्या बदलांमुळे कुणाला किती फायदा होतो हे 23 मे रोजी कळणार आहे.

एकीकडे विजयासाठी विविध पक्षातील नेत प्रचंड उन्हात घाम गाळत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील 11 विद्यमान खासदार नाराज झालेत. सर्वच मोठ्या पक्षांनी विद्यमान 11 खासदारांचं तिकीट कापल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना आता दुसऱ्या उमेदवारांचा प्रचार करावा लागतोय. काही खासदारांनी तर तिकीट नाकारल्याने पक्षाविरोधात बंड पुकारलं. मात्र काही बंडोबांना थंड करण्यात पक्षांना यश आलंय, तर काही विद्यमान खासदार अजूनही रुसून बसले आहेत. विद्यमान खासदारांना तिकीट नाकारण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने 23 पैकी 7 विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलंय.

भाजपने या खासदारांचं तिकीट कापलं

मुंबईचे भाजपचे सर्वात चर्चेत असलेले विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता भाजपने कट केला. त्यांच्या जागी नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी भाजपने दिली.

पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या जागी पालकमंत्री गिरीश बापट यांना पक्षाने उमेदवारी दिली.

अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता पक्षाने कट केलाय. त्यांच्या जागी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली.

जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना सुद्धा भाजपने तिकीट नाकारलंय. त्यांच्या जागी आधी स्मिता वाघ आणि नंतर उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर केल्यानंतरही भाजपला उमेदवार बदलावा लागला.

दिंडोरीचे विद्यमान खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट करण्यात आलाय. त्यांच्या जागी राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या भारती पवार यांना लोकसभेचं तिकीट भाजपने दिलंय.

सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्या कामगिरीवर पक्ष नाराज असल्याने त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यांच्या जागी डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांना भाजपने मैदानात उतरवलंय.

लातूरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचं तिकीट भाजपने कापलंय. त्यांच्या जागी सुधाकर श्रुंगारे यांना पक्षाने तिकट दिलंय.

शिवसेनेकडूनही एका खासदाराचा पत्ता कट

भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही एका विद्यमान खासदाराचं तिकीट कापलं. विशेष म्हणजे उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली. खा. गायकवाड यांची वादग्रस्त प्रतिमा यास कारणीभूत असल्याची चर्चा आहे. विमान प्रवास करत असताना त्यांनी घातलेला गोंधळ त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा आहे. तिकीट कापल्यानंतर रवी गायकवाड यांच्या समर्थकांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तिकीट देण्याची मागणी केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शिवसेनेने विद्यमान खासदार रवी गायकवाड यांच्या जागी उस्मानाबादेतून ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलंय.

राष्ट्रवादीने एक तिकीट कापलं, दुसरं तिकीट कापण्याची नामुष्की

राष्ट्रवादीचे राज्यात 4 खासदार आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीने दोन विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलंय.  माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केल्याने त्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं नाही किंवा मोहिते पाटलांनीच माघार घेतली असं म्हणावं लागेल. त्यांच्या ऐवजी संजय शिंदे यांना पक्षाने उमेदवारी दिली. तर भंडारा गोंदियातील पोट निवडणुकीत विजय मिळवूनही मधुकर कुकडे यांचा पत्ता कट करण्यात आलाय. नाना पंचबुद्धे यांना राष्ट्रवादीने तिकिट दिलंय. पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतरही पक्षाने तिकीट नाकारल्याने कुकडे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

काँग्रेसच्या राजीव सातवांची माघार

राज्यात काँग्रेसचे दोन विद्यमान खासदार आहेत. मात्र असं असूनही काँग्रेसने एका विद्यमान खासदाराला तिकीट नाकारलंय. अशोक चव्हाण आणि राजीव सातव यांच्यात मतभेद असल्यामुळे राजीव सातव लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडल्याची माहिती आहे.  त्याच्या ऐवजी दुसरा उमेदवार देण्यात आलाय. हिंगोलीतून 2014 साली मोदी लाटेतही राजीव सातव निवडून आले होते. मात्र त्यांच्या ऐवजी पक्षाने सुभाष वानखेडे यांना तिकीट दिलंय.

विद्यमान खासदारांचा पत्ता कट करताना सर्वच पक्षांनी राजकीय गणितं मांडल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. पक्षांतर्गत अंसतोष, नाराजी, गटबाजी आणि विजयाचं गणित लक्षात ठेवून विद्यमान खासदारांना तिकीट नाकारण्यात आल्याची माहिती आहे. तिकीट नाकारल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अहमदनगरमध्ये दिलीप गांधी यांनी तर मुलाला अपक्ष म्हणून मैदानात उतरवलं होतं. मात्र पक्षाला त्यांची नाराजी दूर करण्यात यश आलं. त्यामुळे विद्यमान खासदारांच्या नाराजीचा फटका आता 11 उमेदवारांना बसणार का? की 11 नवे चेहरे लोकसभेत पोहोचणार? हे येत्या 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे.