उद्ध्वस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, शेतकऱ्यांची थट्टा, काँग्रेसचा सरकारवर निशाणा

राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र या मदतीवरून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

उद्ध्वस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, शेतकऱ्यांची थट्टा, काँग्रेसचा सरकारवर निशाणा
vijay wadettiwar
| Updated on: Oct 07, 2025 | 4:14 PM

अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. मात्र या मदतीवरून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

ही शेतकऱ्यांची थट्टा

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, महायुती सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर मध्ये 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमध्ये गेल्या 15 दिवसात 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना आज फक्त सरकारने मदतीचे आकडे फुगवून सांगितले. ही शेतकऱ्यांची थटटा केल्याची टीका काँग्रेस विजय वडेट्टीवार यांनी केली.

हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची अपेक्षा होती

पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ‘राज्यात शेतकऱ्यांची जमीन खरवडून निघाली आहे. त्यांची जनावर वाहून गेली आहेत अशा वेळी शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये हेक्टरी मदत करण्याची अपेक्षा होती. अस असताना NDRF निकषानुसार दिलेली मदत ही तुटपुंजी आहे. याने शेतकरी उभा राहणार नाही तर उद्धवस्त होईल.

पंजाबसारखे राज्य केंद्राची मदत न घेता प्रति हेक्टरी 50 हजार पर्यंत मदत देऊ शकते मग महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्यात शेतकऱ्यांना ठोस मदत का दिली जात नाही? सरकारने जाहीर केलेली मदत दिवाळीच्या आधी मिळणार आहे का?शेतकऱ्यांबरोबर शेतमजूर देखील अडचणीत आला आहे, त्यांना काय मदत मिळणार, असा प्रश्न वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.

राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असताना त्याची घोषणा केली नाही. कर्जमाफी करणार करणार फक्त तारीख पे तारीख सरकार सांगत आहे. पण नेमकी शेतकरी कर्जमाफी कधी देणार हे सरकार सांगत नाही’ असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.