MNS : मित्र पक्षच आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देणार मोठा धक्का
MNS : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज त्यांचा मित्र पक्षच मोठा धक्का देणार आहे. एकेकाळी नाशिक जिल्हा मनसेचा गड मानला जायचा. पण आज स्थिती खूप वेगळी आहे. 2008 साली मराठीच्या मुद्यावरुन राज ठाकरेंना अटक झाली, त्यावेळी नाशिकमध्ये मनसेची ताकद दिसून आली होती.

नाशिक जिल्हा एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गड समजला जायचा. राज ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षात नाशिककरांनी मनसेला साथ दिली होती. पण 2014 विधानसभा निवडणुकीनंतर मनसेला नाशिकमध्ये गळती लागली. मनसेची ताकद हळूहळू कमी होत गेली. पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत फक्त नाशिक महानगरपालिकेत मनसेला सत्ता मिळवता आली आहे. अन्यत्र पक्षाचा संघर्ष सुरु आहे. 2008 साली मराठीच्या मुद्यावरुन राज ठाकरेंना अटक झाली, त्यावेळी नाशिकमध्ये मनसेची ताकद दिसून आली होती. नाशिकमध्ये मनसेकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा फौजफाटा होता. वसंत गीतेंसारखे नेते होते.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले. त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून मनसेचे तीन आमदार निवडून आले होते. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून राज्यातील अन्य भागांप्रमाणे नाशिकमध्येही मनसेची ताकद कमी-कमी होत गेली. 2014 त्यानंतर 2019 या दोन विधानसभा निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार जिंकलेला नाही. मनसेच्या उमेदवारांना मिळालेली मत पाहिली, तर जनाधार किती मोठ्या प्रमाणात घटला आहे ते दिसून येतं.
भाजपच देणार धक्का
आज नाशिकमध्ये मनसेला पुन्हा एक मोठा धक्का बसणार आहे. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक योगेश शेवरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. आज नाशिकमधील मनसेचे 25 ते 30 पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती हा पक्ष प्रवेश होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच मनसेला पुन्हा गळती लागली आहे.
राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर देखील गळती
मागच्या काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी नाशिक दौरा करत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांसोबत वन टू वन चर्चा केली होती. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर देखील पक्षातील गळती सुरूच आहे. पक्षातील माजी नगरसेवकांसह आता पदाधिकाऱ्यांची देखील मनसेला सोडचिठ्ठी.