देवदर्शनाहून येतानाच काळाने गाठलं ! भाविकांचा ट्रॅक्टर दरीत कोसळला; 2 ठार, 24 जखमी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खामगाव येथे पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर दरीत कोसळले. या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले. ट्रॅक्टरचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने मोठी हळहळ व्यक्त झाली आहे.

देवदर्शनाहून येतानाच काळाने गाठलं ! भाविकांचा ट्रॅक्टर दरीत कोसळला; 2 ठार, 24 जखमी
ट्रॅक्टर नदीत कोसळून 2 ठार, अनेक जखमी
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 18, 2025 | 11:50 AM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील खामगाव येथील ट्रॅक्टर पिनाकेश्वर महादेवाच्या डोंगराच्या घाटातील दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये दोन महिला भाविकांचा मुत्यू झाला तर 24 भाविक जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. कांताबाई नारायण गायके (वय 50, रा.खामगाव ता.कन्नड) कमाबाई जगदाळे (वय 65, जानेफळ ता.वैजापूर) असे मृत झालेल्या महिला भाविकांची नावे आहे. तर सोनाली आप्पा राऊत (वय 14 रा.खामगाव) हिची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

अचानक ब्रेक फेल झाले आणि ट्रॅक्टर थेट दरीत…

नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी हे सर्व भाविक आप्पा राऊत यांच्या छोट्या ट्रॅक्टरमध्ये बसून गेले होते. दर्शन आटोपून ट्रॅक्टरमधूनच ते घरी परत येत होते, मात्र डोंगराच्या पायथ्यापासुन अगदी हाकेच्या अंतरावर येत असताना ट्रॅक्टरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि ट्रँक्टर भाविकासह थेट घाटाच्या दरीत कोसळले. आणि झाडात जाऊन अडकले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोलीस हवालदार भास्कर बस्ते, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर श्रीखंडे श्रीखंडे यांनी या सर्व जखमी भाविकांना कसेबसे बाहेर काढुन तातडीने प्राथमिक उपचारासाठी मिळेल त्या वाहनांने बोलठाण या ठिकाणी पाठवले. 23 जखमी भाविकांची प्रकृती स्थिर असून सोनाली आप्पा राऊत या 14 वर्षीय मुलीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

जखमींची नावे

या अपघातात 24 जण जखमी झाले आहेत. चेतन प्रकाश कवडे (१०) प्रतिक्षा प्रकाश कवडे, (१२) माया प्रकाश कवडे, (३२) आप्पा सोपान राऊत (३५) श्रावणी आप्पा राऊत (८) वर्षा आप्पा राऊत (३२) कल्याणी राजेंद्र कवडे (२०) साई विजय कवडे ( ११) प्रतिक्षा विजय कवडे (१६) आदित्य योगेश कवडे (७) प्रगती सोमनाथ कवडे ( ११) दिलीप डिगंबर गायके (३() योगेश अशोक कवडे (३३) पंकज गोरखनाथ कवडे (३५) विजय दादा कवडे (४२) पारसनाथ राऊत ( ४२) स्वाती पारसनाथ राऊत ( १९) मनीषा पारसनाथ राऊत (३८) बालीका दिलीप गायके (३०) माऊ दिलीप गायके ( १०) चिऊ दिलीप गायके (१२) सुवर्णा संदिप गायके (३१) मावडी संदिप गायके (९) सर्व रा.खामगाव ता.कन्नड) यांच्या छत्रपती संभाजीनगर, शिऊर बंगला, बोलठाण या वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

मद्यधुंद चालकाने 6 जणांना उडवले; तीन वाहनांना जोरदार धडक

छत्रपती संभाजीनगरातील पदमपुरा ते समर्थनगर भागात आणखी एक अपघात झाला. तेथे रात्री उशिरा एका मद्यधुंद कारचालकाने 6 जणांना उडवले. त्यासोबत भरधाव कार चालकाने तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला आणि मुलगी गंभीर जखमी झाली. नागरिकांनी चालकाला चोप दिला आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. संकेत शंकर अंभोरे असे कार चालकाचे नाव आहे.

संकेत अंभोरे हा रात्री कारने क्रांती चौकाकडून पदमपुऱ्याच्या दिशेने येताना अहिल्यादेवी होळकर चौकातून पंचवटी रोडवर पायी जाणाऱ्या अनसाबाई भागीरथ बरंडवाल आणि एका मुलीला उडवले. यावेळी काही तरुणांनी कारचा पाठलाग केला. कार मध्यवर्ती बसस्थानकाच्या दिशेने धावत होती. चालकाने कार्तिकी सिग्नल परिसरात एका कारला धडक दिली. त्यानंतर त्याने त्याची कार सावरकर चौकाच्या दिशेने पळवली. त्यानंतर बंडू वैद्य चौकात दुचाकीला धडक दिली.एवढंच नव्हे तर पुन्हा समर्थनगर परिसरात स्कॉर्पिओला धडक दिली.

मात्र अखेर तेथे कार थांबल्यानंतर पाठलाग करणाऱ्या तरुणांनी संकेतला गाठले. त्यावेळी संकेतने मद्य प्राशन केल्याचे लक्षात आले. नागरिकांनी संकेतला चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळाहून संकेतला ताब्यात घेतले. त्यानंतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात आणले. प्रकाश कटारे यांच्या तक्रारीवरून रात्री गुन्हा दाखल झाला आहे.