Tukaram Mundhe: अन्याय, भ्रष्टाचार पाहूनही तुम्ही शांत बसत असाल तर…तुकाराम मुंढे यांच्या पोस्टची जोरदार चर्चा
Tukaram Mundhe New Post: तुकाराम मुंढे यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या पोस्टमधून त्यांनी नागरिकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

Tukaram Mundhe Post: सध्या सगळीकडे तुकाराम मुंढे यांचीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांचे कौतुक होताना दिसत आहे. सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर एक सडेतोड पोस्ट शेअर केली आहे ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे. समाजात घडणाऱ्या अन्यायावर जे नागिरक शांत बसतात त्यांच्या मानसिकतेवर त्यांनी थेट बोट उचलले आहे. कोणीतरी बोलेल आणि कोणीतरी करेल मानसिकता हजारो वर्षांपूर्वीच्या हस्तिनापुरातील भीष्म आणि द्रोणांसारखीच आजच्या समाजालाही अपंग बनवत आहे.
द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा संदर्भ देत तुकाराम मुंढे यांनी लिहिले की, द्रौपदीचा प्रश्न फक्त दुर्योधनाला नव्हता, तर सभेत बसलेल्या प्रत्येक प्रभावशाली माणसाला होता. भीष्माकडे मूल्यांची कमतरता नव्हती, तर योग्य क्षणी तात्काळ कृती करण्याची कमतरता होती. आजही आपण त्याच दरबारात बसलेलो आहोत, फक्त त्याचा आकार बदलला आहे. सोशल मीडियावरील एखादा व्हिडिओ, पोस्ट किंवा ग्रुप चॅट जितके जास्त लोक बघतात, तितकीच अन्यायाविरोधातील जबाबदारी विसरुन जातात.
View this post on Instagram
समाजातील दुटप्पीपणावर प्रहार करताना ते पुढे म्हणतात,” बदल हवा असे प्रत्येकजण म्हणतो, पण तो बदल घडवणारा मात्र दुसरा कोणीतरी असावा आपण स्वत: असू नये. शिवाजी जन्माला यावा पण शेजारी हीच आपली मानसिकता अजूनही कायम आहे. आपल्याला आता आणखी एका छत्रपती शिवाजी महाराजांची वाट पाहण्याची विशेष गरज नाही. आपल्या जागी, त्याच एका क्षणी घेतलेला एक साधा निर्णयच खरे स्वराज्य घडवू शकतो, असे मुंढे म्हणाले.
तुकाराम मुंढे यांनी आपल्या पोस्टमधून तीन मुख्य गोष्टींवर भर दिला आहे. मौन कधीही स्वस्त नसते, धैर्य आयत्या वेळी घडत नाही, जबाबदारी उचलायची असते हे वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याला थांबवणे हीच खरी मालकी आणि नेतृत्व असते. महाभारत श्रीकृष्णाच्या चमत्कारावर नाही तर कुरुक्षेत्रावर संपले होते. आज आपल्यासाठी कोणताही चमत्कार घडेल असं नाही. फक्त तो क्षण आहे आणि आपण काय करतो तेव्हा ते महत्त्वाचे आहे, असे सांगत मुंढे यांनी नागरिकांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. तुकाराम मुंढे यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
