Tukaram Mundhe : बायकोला घरात जेवणाबद्दल नोटीस दिली का? तुकाराम मुंढेंच्या उत्तराने पिकली खसखस; काय उत्तर दिलं?
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर अगोदर त्यांनी त्यांच्याच खात्याला काही आदेश दिले. मी सर्वात अगोदर माझ्याच कार्यालयात तपासणी केली, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे हे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच भेसळ खाद्यपदार्थांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक रेस्टॉरंट्स, हॉटेल्सवर कारवाई केली आहे. तसेच भेसळयुक्त खाद्यपदार्थ नाहीसे व्हावेत यासाठी काही नियम घालून दिले आहेत. या निमयांचे पालन न केल्यास हॉटेल मालकांवर कठोर कारवाई केली जातीये. एखाद्या रेस्टॉरंटने नियम मोडल्यास तुकाराम मुंढे संबंधितांना थेट नोटीस पाठवून पुढील कारवाई करतात. दरम्यान, त्यांनी एका मुलाखतीत कधी आपल्या पत्नीला एखाद्या कारणामुळे नोटीस दिली आहे का? या प्रश्नाचे खास शैलीत उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या उत्तराने एकच हशा पिकला.
घरात बायकोला नोटीस देण्याची ताकद…
‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची थेट उत्तरं दिलं. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर अगोदर त्यांनी त्यांच्याच खात्याला काही आदेश दिले. मी सर्वात अगोदर माझ्याच कार्यालयात तपासणी केली. रेस्टॉरंटमध्ये काय काय खायला असतं? असं मी त्यांना विचारलं. यावर बोलताना आम्ही फक्त चहा देतो, असं त्यांनी सांगितलं. तायवरही तुम्ही फक्त चहा देत असाल तर त्यात साखर कमी टाका, असा आदेश मी त्यांना दिल्याचं तुकाराम मुंढे म्हणाले. तुकाराम मुंढे यांनी आपल्या घरातील वातावरण आणि घराबाबतही प्रतिक्रिया दिली. घरात बायकोला जेवणाबाबत कधी नोटीस दिली का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना घरात बायकोला नोटीस देण्याची ताकद कुणात नाही. आपल्यालाच नोटीस येत असतात, असं मिश्कील भाष्य त्यांनी केलं. त्यांच्या या उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आता पुढचं टार्गेट चायनीज फुड
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी आमचं पुढचं टार्गेट हे चायनीज फुड असेल, असं स्पष्ट केलं. अगोदर चायनीज स्टॉल कमी होते. आता त्यांचे प्रमाण वाढले आहे. यापुढे त्याकडे आम्ही लक्ष देऊ, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलंय.
