शेवटी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावं लागलं…, बावनकुळेंचं मोठं विधान

महाराष्ट्र सरकारने तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी १८६५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. या निर्णयाचे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे तुळजापूर येथे सत्कार करण्यात आले. बावनकुळे यांनी या यशात विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या योगदानाचा उल्लेख केला.

शेवटी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावं लागलं..., बावनकुळेंचं मोठं विधान
| Updated on: Aug 08, 2025 | 11:41 AM

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या विकासासाठी तब्बल १८६५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला नुकतीच राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा तुळजापूर येथे जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी विलासराव देशमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत एक मोठे विधान केले.

शेवटी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावं लागलं

चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कार्यक्रमावेळी भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी २१ वर्षांपूर्वीच्या एका घटनेचा उल्लेख केला. “मला अभिमान आहे की तुम्ही २१ वर्षांपूर्वीची घटना सांगितली. २१ वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यासमोर हा विकास आराखडा मांडला होता. मला कोणावर टीका करायची नाही. तो अधिकार मला नाही. पण हा आराखडा पूर्ण करण्यासाठी शेवटी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि तुम्हाला आमदार व्हावं लागलं”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

“आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे. अनेक वर्ष हा आराखडा प्रलंबित राहिला. मी जेव्हा हा विकास आराखडा पाहिला, तेव्हा आम्ही सर्वजण बसलो होतो. त्यावेळी आमच्या अंगावर शहारे येतील, इतकं सुंदर कार्य या ठिकाणी केले जाणार आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. हा विकास आराखडा मंजूर झाल्यामुळे तुळजापूर शहरात मोठा उत्साह आहे. या निधीमुळे मंदिराच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ होऊन भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील”, असे बोललं जात आहे.

तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा नेमका कसा?

दरम्यान महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आगामी नवरात्र उत्सवात होणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत ठरल्यानुसार, या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने आणि देशभरातून येणाऱ्या सुमारे १ ते १.५ कोटी भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हा १,८६५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराच्या विकासाशी संबंधित सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील तीन ते साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही या बैठकीत नमूद करण्यात आले आहे.