
राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या तुषार आपटे यांची भाजपाने बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली होती. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आता तुषार आपटेंनी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. आपटेंनी आपला राजीनामा भाजपाच्या वरिष्ठांकडे सोपवला आहे. सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देताना तुषार आपटे म्हणाले की, ‘मी स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा देत आहे. खाजगी शाळेचा आणि भाजपला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे. बाकीच्या गोष्टी नंतर बोलू. माझा राजीनामा मी स्वतःहून देत आहे. पक्षाची बदनामी होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे.’
बदलापूर उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांनी तुषार आपटे यांच्या प्रकरणावर भाष्य केले होते. त्या म्हणाल्या की, ‘काल भाजपने स्वीकृत नगरसेवकांची निवड केली, सर्व निर्णय त्या पक्षाचा अधिकार आणि भूमिका आहे. हा विषय न्यायालयात आहेत. आम्ही जेव्हा आंदोलन केली आमची एकच मागणी होती की मुख्य आरोपीला शिक्षा झाली पाहिजे होती आणि त्याला निसर्गाने शिक्षा दिली. या गोष्टी न्यायालयामध्ये असल्यामुळे न्यायालयाचा निकाल येईल. आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.
आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेत भाजप स्वीकृत नगरसेवक झाला आहे यावरून लैंगिक अत्याचार याबद्दल भाजपने बक्षीस दिलाय का असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता. यावर बोलताना भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते की, ‘त्याच्यावर योग्य कारवाई होईल. ज्यांनी ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होत असते. निष्पक्षपणे कारवाई होईल चिंता करण्याची गरज नाही.’
मनसे नेते अविनाश जाधव यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटले होते की, ‘भाजप पक्ष स्वतःला पांढरपेशी पक्ष समजत आहे असा पक्ष अशा विकृत लोकांना नगरसेवक करत पक्षात घेत आहे यावकरून या पक्षाची मानसिकता कळते. मनसेकडून अशा व्यक्तींचा निषेध. भाजप पक्षाला विनंती ताबडतोब त्याला पदावरून हटवा पुढची गाठ मनसेची आहे. नगरसेवकाचा तात्काळ राजीनामा घेतला गेला नाही तर येत्या 13 ,14 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलापूर मध्ये मोठं आंदोलन करेल.’ दरम्यान, सर्वच स्तरातून झालेल्या टीकेनंतर आता तुषार आपटेने राजीनामा दिला आहे.